टी२० मालिकेवर भारताचा कब्जा
By Admin | Published: February 2, 2017 02:10 AM2017-02-02T02:10:11+5:302017-02-02T02:10:11+5:30
फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने एकतर्फी झालेल्या टी२० सामन्यात इंग्लंडचा ७५ धावांनी धुव्वा उडवला. यासह भारताने तीन
बंगळुरु : फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने एकतर्फी झालेल्या टी२० सामन्यात इंग्लंडचा ७५ धावांनी धुव्वा उडवला. यासह भारताने तीन टी२० सामन्यांच्या मालिकेवर २-१ असा कब्जा केला. भारताने दिलेल्या २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव केवळ १२७ धावांत कोलमडला. चहलने या सामन्यातील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर सामनावीरसह मालिकावीरचा किताबही पटकावला.
चहलने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना ४ षटकात २५ धावांच्या मोबदल्यात तब्बल ६ गडी बाद करुन इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये भेदक मारा करताना चहलने इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तसेच, दुसरीकडून जसप्रीत बुमराहने टिच्चून मारा केला. चहल - बुमराह यांच्या भेदकतेपुढे इंग्लंडने अवघ्या ८ धावांमध्ये ७ बळी गमावले. त्यामुळे एकवेळ ३ बाद ११९ अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडचा डाव १२७ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून जो रुट (४२) आणि कर्णधार इयॉन मॉर्गन (४०) यांनी संघाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, दोघांनाही चहलने बाद केल्यानंतर इंग्लंडची वाताहत झाली.
तत्पूर्वी, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून इंग्लंडने यजमान भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार विराट कोहली (२) धावबाद झाल्याने भारताला मोठा धक्का बसला.
परंतु, सुरेश रैनाने लोकेश राहुलसह ६१ धावांची भागीदारी करुन संघाला सावरले. स्टोक्सने राहुलला (२२) त्रिफळाचीत करुन ही जोडी फोडली. यानंतर महेंद्रसिंह धोनीने (५६) रैनाला पुरेपूर साथ दिली. मोइन अलीला धोनी - रैना यांनी टार्गेट करत इंग्लंडची धुलाई केली. रैनाने ४५ चेंडूत २ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी केली. यानंतर युवराजनेही केवळ १० चेंडूत एक चौकार व ३ षटकारांसह २७ धावा चोपल्या. धोनी ३६ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह शानदार ५६ धावांची खेळी करुन परतला. (वृत्तसंस्था)
धावफलक :
भारत : कोहली धावबाद (जॉर्डन) २, राहुल त्रि. गो. स्टोक्स २२, रैना झे. मॉर्गन गो. प्लंकेट ६३, धोनी झे. रशिद गो. जॉर्डन ५६, युवराज झे. बटलर गो. मिल्स २७, रिषभ पंत नाबाद ६, हार्दिक धावबाद (स्टोक्स - बटलर) ११. अवांतर - १५. एकूण : २० षटकात ६ बाद २०२ धावा. गोलंदाजी : मिल्स ४-०-३२-१; जॉर्डन ४-०-५६-१; प्लंकेट २-०-२२-१; स्टोक्स ४-०-३२-१; अली ४-०-३०-०; रशिद २-०-२३-०.
इंग्लंड : रॉय झे. धोनी गो. मिश्रा ३२, बिलिंग्स झे. रैना गो. चहल ०, रुट पायचीत गो. चहल ४२, मोर्गन झे. पंत गो. चहल ४०, बटलर झे. कोहली गो. बुमराह ०, स्टोक्स झे. रैना गो. चहल ६, अली झे. कोहली गो. चहल २, प्लंकेट त्रि. गो. बुमराह ०, जॉर्डन यष्टीचीत धोनी गो. चहल, रशिद नाबाद ०, मिल्स झे. कोहली गो. बुमराह ०. अवांतर - ५. एकूण : १६.३ षटकात सर्वबाद १२७ धावा.
गोलंदाजी : नेहरा ३-१-२४-०; युझवेंद्र चहल ४-०-२५-६; जसप्रीत बुमराह २.३-०-१४-३; मिश्रा ४-०-२३-१; हार्दिक पांड्या २-०-१७-०; रैना १-०-२२-०.