भारताचा फ्रान्सला धक्का
By admin | Published: June 21, 2015 01:09 AM2015-06-21T01:09:07+5:302015-06-21T01:09:07+5:30
मनप्रीतसिंग, देवेंद्र वाल्मीकी आणि रमणदीप सिंगने नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलने भारतीय हॉकी संघाने वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या सामन्यात बलाढ्य फ्रान्स संघाला ३-२ गोलने पराभूत केले.
एंटवर्प : मनप्रीतसिंग, देवेंद्र वाल्मीकी आणि रमणदीप सिंगने नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलने भारतीय हॉकी संघाने वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या सामन्यात बलाढ्य फ्रान्स संघाला ३-२ गोलने पराभूत केले. केएचसी ड्रॅगॉन्स स्टेडियमवर झालेल्या चुरशीच्या लढतीत फ्रान्सच्या आॅलिव्हर सॅन्चेसने तिसऱ्याच मिनिटाला गोल करून आशियाई चॅम्पियन भारतीय संघावर दडपण आणले. त्यानंतर भारताच्या मनप्रीतसिंगने २६व्या मिनिटाला आणि लगेचच ३ मिनिटाच्या अंतराने देवेंद्र वाल्मीकीने नोंदविलेल्या लागोपाठ २ गोलमुळे भारताला २-१ आघाडी मिळाली.
सामन्याच्या २२व्या मिनिटाला फ्रान्स खेळाडूंना गोल करण्याची संधी मिळाली होती. पण त्यांच्या बे्रसेसला त्या संधीचा फायदा घेता आला नाही. त्यानंतर सॅन्चेसलासुद्धा गोल करण्याची संधी मिळाली होती. परंतु भारताच्या श्रीजेसने त्याने मारलेला चेंडू चपळाईने अडवला.
४३ व्या मिनिटाला फ्रान्सच्या सिमन्स मार्टिन ब्रिसेसने गोल करून बरोबरी साधली. ही बरोबरी खूप वेळ अबाधित होती. ही लढत बरोबरीत संपणार असे दोन्ही संघांच्या पाठीराख्यांना वाटत होते. भारतीय संघाची आघाडीची फळी ही बरोबरी तोडून काढण्याचा प्रयत्न जोरदार करत होती. ५८व्या मिनिटाला कर्णधार सरदारासिंगच्या ताब्यात चेंडू असताना त्याने रिव्हर्सहीट फ्रान्सच्या सर्कलमध्ये मारला. तेथे उभ्या असलेल्या आकाशदीप सिंगने कोणतीही चूक न करता चेंडू अडवीत समोर उभ्या असलेल्या रमणदीपकडे पास केला. रमणदीपने कोणतीही चूक न करता चेंडू फ्रान्सच्या गोलमध्ये टाकून भारताला ३-२ आघाडी मिळवून दिली. अखेरच्या काही मिनिटात फ्रान्सने अपयशी प्रयत्न केले.