भारताची भिस्त फलंदाजांवर

By Admin | Published: August 15, 2014 12:27 AM2014-08-15T00:27:58+5:302014-08-15T00:27:58+5:30

विराट कोहलीने सलग दुसऱ्या दिवशीही सरावामध्ये घाम गाळला. प्रशिक्षक डंकन फ्लेचरही यावेळी त्याला मार्गदर्शन करीत असल्याचे चित्र दिसले

India's relentless batting | भारताची भिस्त फलंदाजांवर

भारताची भिस्त फलंदाजांवर

googlenewsNext

लंडन : विराट कोहलीने सलग दुसऱ्या दिवशीही सरावामध्ये घाम गाळला. प्रशिक्षक डंकन फ्लेचरही यावेळी त्याला मार्गदर्शन करीत असल्याचे चित्र दिसले. उजव्या यष्टिबाहेरचे चेंडू खेळण्याचा कोहलीने कसून सराव करीत शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले.
गत दोन कसोटी सामन्यांचा अनुभव लक्षात घेता उजव्या यष्टिबाहेरचा चेंडूवरचा फटका खेळण्याचा मोह भारतीय संघासाठी आत्मघातकी ठरला आहे. जेम्स अ‍ॅन्डरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांनी भारतीय फलंदाजांच्या स्विंग व सीम मारा खेळण्याचा उणिवा स्पष्ट केल्या. मॅन्चेस्टरमध्ये भारताचे दोन्ही डाव ९० षटकांत आटोपले. यावरुन भारतीय संघ एकाच दिवशी दोनदा बाद झाल्याचे स्पष्ट झाले.
मालिकेत २-१ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला शुक्रवारपासून प्रारंभ होणाऱ्या पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
भारताच्या प्रत्येक फलंदाजाने इंग्लंडच्या माऱ्याला यशस्वपणे तोंड देण्याचे धैर्य दाखविले तर भारताला अनुकुल निकाल मिळविता येईल. मुरली विजय व गौतम गंभीर यांच्यावर संघाला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी आहे. गेल्या आठ कसोटी सामन्यांत भारताला एकदाही अर्धशतकी सलामी मिळाली नाही. त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. विजयने या मालिकेत सुरुवातीपासून खेळपट्टीवर तळ ठोकण्याची तयारी दर्शविली आहे. अनुभवी गंभीरने जर लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल.
भारताची आघाडीची फळी अपयशी ठरत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मधल्या फळीतील व तळाच्या फलंदाजांच्या साथीने डाव सावरण्याचे धैर्य दाखविले आहे. भारताने या कसोटी सामन्यात पाच गोलंदाजांना खेळविण्याचा निर्णय घेतला तर आर. अश्विन व भुवनेश्वर कुमार यांच्याकडून फलंदाजीतही उपयुक्त योगदान मिळेल, अशी आशा आहे. सन्माजनक धावसंख्येची मजल मारल्यानंतर गोलंदाजांना त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल.
लॉर्डस्वर कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना ७४ धावांच्या मोबदल्यात ७ बळी घेण्याची कामगिरी करणाऱ्या ईशांत शर्माच्या पुनरागमनामुळे संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. त्याला भुवनेश्वर कुमारची योग्य साथ लाभेल अशी आशा आहे. त्याच्या जोडीला वरुण अ‍ॅरोनसारख्या वेगवान गोलंदाजाला इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची संधी राहिल.
ओव्हलच्या खेळपट्टीवर अखेरच्या दोन दिवसांमध्ये फिरकीपटूंची कामगिरी महत्त्वाची ठरण्याची शक्यता लक्षात घेता अश्विनला छाप सोडण्याची संधी आहे.

Web Title: India's relentless batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.