भारताची सन्मानजनक मजल
By admin | Published: August 20, 2015 11:43 PM2015-08-20T23:43:10+5:302015-08-21T00:14:34+5:30
युवा सलामीवीर लोकेश राहुलचे शतक आणि कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांनी झळकविलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध आजपासून खेळल्या
कोलंबो : युवा सलामीवीर लोकेश राहुलचे शतक आणि कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांनी झळकविलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध आजपासून खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद ३१९ धावांची सन्मानजनक मजल मारली. पहिल्या लढतीत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी या लढतीत चांगली कामगिरी केली. कुमार संगकाराच्या निरोपाच्या कसोटी सामन्यात भारताच्या डावात राहुल (१०८), कोहली (७८) आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा रोहित (७९) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारताची एकवेळ २ बाद १२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर राहुल व कर्णधार कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. कोहलीने १०७ चेंडूंमध्ये ८ चौकार व १ षटकाराच्या साह््याने ७८ धावांची खेळी केली. त्याआधी, सकाळच्या सत्रात धम्मिका प्रसादने दोन बळी घेत श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. सलामीवीर मुरली विजय (०) आणि अजिंक्य रहाणे (४) यांना मोठी खेळी करता आली नाही. दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणाऱ्या विजयला पुनरागमनात चांगली कामगिरी करता आली नाही. रहाणे तिसऱ्या क्रमांकावर अपयशी ठरला. त्यानंतर दुष्मंता चामीराच्या पहिल्या षटकात राहुल सुदैवी ठरला. त्याचा उडालेला झेल गलीमध्ये तैनात जेहान मुबारकला टिपता आला नाही. दुसऱ्या टोकाकडून कोहली शानदार फलंदाजी करीत होता. उपाहारानंतर कोहली व राहुल यांनी शानदार फलंदाजी केली. विराटने ११ वे कसोटी अर्धशतक ६३ चेंडूंमध्ये पूर्ण केले. भारताने २८ व्या षटकात १०० धावांचा पल्ला ओलांडला. त्यानंतर राहुलनेही वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले.
कोहलीने चामिराच्या गोलंदाजीवर चौकार वसूल करून आक्रमक पवित्रा कायम राखला. विराट शतकी खेळी करणार, असे वाटत असताना रंगाना हेराथच्या गोलंदाजीवर अँजेलो मॅथ्यूजने शानदार झेल टिपून त्याला तंबूचा मार्ग दाखविला. कोहलीने १०७ चेंडूंमध्ये ८ चौकार व १ षटकार ठोकला. राहुलने १९० चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार व एका षटकाराच्या साह्याने शतक साकारले. रोहितने ७९ धावांची खेळी केली; पण दिवसाच्या अखेरच्या षटकांमध्ये त्याने विकेट गमावली. कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या रोहितने संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला.
मला आणखी धावा काढायला पाहिजे होत्या : राहुल
कोलंबो : लोकेश राहुलने शतकी खेळी करीत श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा डाव सावरला, पण संघाला अधिक मजबूत स्थिती गाठून देण्यासाठी आणखी धावा करायला पाहिजे होत्या, अशी प्रतिक्रिया या सलामीवीराने व्यक्त केली. २३ वर्षीय राहुलने कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक झळकावल्यामुळे समाधान व्यक्त केले, पण १०८पेक्षा अधिक धावा फटकावता न आल्यामुळे निराशा जाहीर केली. ‘‘मला पहिल्या कसोटी सामन्यात धावा फटकावता आल्या नव्हत्या. आज नैसर्गिक खेळ करता आल्यामुळे समाधान झाले. मला यापेक्षा सरस कामगिरी करण्याची संधी होती, पण त्यात अपयशी ठरल्यामुळे निराश झालो. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात अधिक धावा फटकावण्याची संधी आहे. त्या वेळी खेळपट्टीवर राहून संघासाठी अधिक धावा वसूल करायला पाहिजे होत्या. मी सध्या शिकत असून, काही बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यात अशी चूक होणार नाही, अशी आशा आहे.’’
धावफलक
भारत पहिला डाव : मुरली विजय पायचित गो. प्रसाद ००, के. एल.
राहुल झे. चांदीमल हो. चामीरा १०८, अजिंक्य रहाणे झे. करुणारत्ने गो.
प्रसाद ०४, विराट कोहली झे. मॅथ्यूज गो. हेराथ ७८, रोहित शर्मा पायचित गो. मॅथ्यूज ७९, स्टुअर्ट बिन्नी झे. चामीरा गो. हेराथ १०, रिद्धिमान साहा नाबाद १९. अवांतर (२१). एकूण ८७.२ षटकांत ६ बाद ३१९. बाद क्रम : १-४, २-१२, ३-१७६, ४-२३१, ५-२६७, ६-३१९. गोलंदाजी : प्रसाद २०-५-७२-२, मॅथ्यूज १०.२-४-१७-१, चामीरा १३-०-५९-१, हेराथ २१-२-७३-२, कौशल २३-२-८२-०.
(वृत्तसंस्था)