भारताची सरावात सलामी
By admin | Published: January 9, 2016 03:28 AM2016-01-09T03:28:08+5:302016-01-09T03:28:08+5:30
शिखर धवन (७४) आणि विराट कोहली (७४) यांच्या तुफानी खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात चांगली केली. टी-२० सराव सामन्यात पश्चिम आॅस्ट्रेलियाला ७४ धावांनी पराभूत केले.
पर्थ : शिखर धवन (७४) आणि विराट कोहली (७४) यांच्या तुफानी खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात चांगली केली. टी-२० सराव सामन्यात पश्चिम आॅस्ट्रेलियाला ७४ धावांनी पराभूत केले.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चार गडी बाद १९२ धावा, अशी विशाल धावसंख्या उभारली होती. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पश्चिम आॅस्ट्रेलियाच्या संघाने ६ बाद ११८ धावा केल्या. भारताला या दौऱ्यात ५ एकदिवसीय व ३ टी -२० सामने खेळायचे आहेत. पहिला एकदिवसीय सामना १२ जानेवारी रोजी पर्थ येथे होईल. भारतीय संघ पश्चिम आॅस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध शनिवारी एकदिवसीय सराव सामना खेळेल.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा स्टार फलंदाज शिखर धवन आणि विराट कोहली यांनी चांगलाच सराव केला. सलामीवीर रोहित शर्मा ६ धावांवरच बाद झाला. मात्र, त्यानंतर आलेल्या विराटने शिखर धवनसोबत १४९ धावांची भागीदारी केली. दोघांनी १०.९१ प्रतिषटक या वेगाने धावा कुटल्या. शिखरने आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सराव सामन्यात फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. त्याने ४६ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तर, कर्णधार विराट कोहलीने ४४ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकार ठोकले. शिखरला मॅथ्यू केली याने बाद केले, तर विराटला जोश निकोलसने तंबूत परतवले. मात्र, तोपर्यंत या दोघांनी पश्चिम आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतलेला होता.
विराट संघाच्या १६१ धावा झाल्यावर बाद झाला, तर शिखर धवन १७३ धावांवर परतला. अजिंक्य रहाणे याने २ धावा केल्या. त्याला रेयान डफिल्ड याने बाद केले. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १४ चेंडूंत नाबाद २२ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि २ षटकार ठोकले.
या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पश्चिम आॅस्ट्रेलियाचा संघ भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात ११८ धावाच तो करू शकला. सलामीवीर ट्रेविस बर्ट याने एकाकी लढत दिली. त्याने ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. त्यासोबतच जोश
इंगलिस याने २० चेंडूंत ११ धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य
कोणताही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.