भारताचा सलग दुसरा पराभव
By admin | Published: July 14, 2015 02:54 AM2015-07-14T02:54:15+5:302015-07-14T02:54:15+5:30
यष्टिरक्षक फलंदाज राचेल प्रिस्टच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंड महिला संघाने दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आज
बंगळुरू : यष्टिरक्षक फलंदाज राचेल प्रिस्टच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंड महिला संघाने दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आज येथे भारताचा सहा गडी राखून पराभव करताना तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली आहे.
मिताली राज हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १३६ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज वेल्लास्वामी वनिताने सर्वाधिक ४१ धावा केल्या, तर हरमनप्रीत कौरने ३० आणि वेदा कृष्णमूर्तीने २९ धावांचे योगदान दिले.
न्यूझीलंडकडून सोफी डेव्हाईन हिने ३१ धावांत २ गडी बाद केले. त्यानंतर प्रिस्टने अवघ्या ३४ चेंडूंत १० चौकार, २ षटकारांसह ६० धावांची वेगवान खेळी खेळताना न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. एमी सॅटरवेट (नाबाद २४) आणि कॅटी पर्किन्स (नाबाद २३) यांनी पाचव्या गड्यासाठी ४७ धावांची नाबाद भागीदारी करताना त्यांच्या संघाला १७.५ षटकांत ४ बाद १३९ या धावसंख्येवर पोहोचवले. प्रिस्टने तिच्या कारकिर्दीत टी-२० तील पहिले अर्धशतक केले. भारताकडून झुलन गोस्वामीने २९ धावांत २ गडी बाद केले. त्याआधी भारताने पाच वनडे सामन्यांची मालिका ३-२ फरकाने जिंकली. (वृत्तसंस्था)