भारताचे दुसरे ‘सुवर्ण यश’
By admin | Published: September 15, 2016 01:01 AM2016-09-15T01:01:20+5:302016-09-15T01:01:20+5:30
झाझरियाने भालाफेकीमध्ये एफ ४६ प्रकारांत जागतिक विक्रमासाह सुवर्णपदक पटकावताना देशाला या स्पर्धेत दुसरे सुवर्ण मिळवून दिले.
रिओ : रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू सलग चमकदार कामगिरी करीत असताना देवेंद्न झाझरियाने भालाफेकीमध्ये एफ ४६ प्रकारांत जागतिक विक्रमासाह सुवर्णपदक पटकावताना देशाला या स्पर्धेत दुसरे सुवर्ण मिळवून दिले. विशेष म्हणजे याआधी २००४ अथेन्स पॅरालिम्पिकमध्येही देवेंद्रने सुवर्ण कमाई केली होती. तसेच, पॅरालिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक सुवर्ण पटकावणारा एकमेव भारतीय खेळाडू असा मानही देवेंद्रने मिळवला आहे.
दखल घेण्याची बाब म्हणजे, देवेंद्रने आपलाच जागतिक विक्रम मागे टाकून नवीन इतिहास रचला. अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये त्याने ६२.१५ मीटरची फेक करून पहिले सुवर्ण पटकावले होते. तर, आता रिओ स्पर्धेत देवेंद्रने ६३.९७ मीटरची लक्षवेधी फेक करून नवा विश्वविक्रम नोंदवला. त्याच वेळी या स्पर्धेतील अन्य भारतीय खेळाडू रिंकू हुड्डा यानेही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना ५४.३९ मीटरची फेक केली. परंतु, त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या देवेंद्रने पॅराअॅथलिट म्हणून देशात मानाचे स्थान मिळवले आहे. देवेंद्रचा २००४ साली अर्जुन पुरस्कार, तर २०१२ साली पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारने गौरव केला आहे. विशेष म्हणजे असा सन्मान मिळवणारा देवेंद्र पहिला पॅराअॅथलिट आहे. तसेच, २०१३ साली लियोन येथे आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीच्या वतीने झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही देवेंद्रने भारताला ‘सुवर्ण’ यश मिळवून दिले होते. दुसरीकडे, देवेंद्रच्या झंझावातापुढे जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला चिनी खेळाडू गुओ चुनलियांगचा काहीच निभाव लागला नाही. त्याला ५९.९३ मीटरच्या फेकीसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर, श्रीलंकेच्या हेराथ मुदियानसेलागे याने ५८.२३ मीटरची चमकदार फेक करताना कांस्यपदकावर नाव कोरले.
त्याचप्रमाणे, देवेंद्रव्यतिरिक्त या स्पर्धेत रिंकू हुड्डा आणि सुंदर सिंग यांच्यावरही भारताची मदार होती. रिंकूने आपल्या सहा संधींमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना ५४.३९ मीटरची फेक केली. परंतु त्याची कामगिरी पाचव्या क्रमांकावर राहिली. त्याच वेळी स्पर्धेत ऐन वेळी वेळेवर न पोहोचल्याने सुंदर स्पर्धेसाठी अवैध ठरला. (वृत्तसंस्था)
देवेंद्रचे अभिनंदन. त्याने आपलाच विक्रम मागे टाकून सुवर्ण कामगिरी केली.
- सचिन पायलट,
अध्यक्ष, राजस्थान प्रदेश
देवेंद्र झझारियाचे सुवर्ण व नव्या विश्वविक्रमासाठी अभिनंदन. हे यश खूप प्रेरणादायी आहे. आशा आहे, की २००४ च्या यशाच्या तुलनेत या वेळी जास्त प्रसिद्धी मिळेल.
- मोहम्मद कैफ, क्रिकेटपटू
देवेंद्र झझारियाला खूप खूप शुभेच्छा. तू आम्हा सर्वांना प्रेरित करतोस.
- अभिनव बिंद्रा, माजी नेमबाज
पॅरालिम्पिक आता ‘प्यारालिम्पिक’ झाले आहे. सुवर्ण आणि नव्या विश्वविक्रमासाठी देवेंद्रला सलाम. त्याने २००४ सालीदेखील सुवर्ण जिंकले होते.
- वीरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटू
अभिनंदन, देवेंद्र झझारिया. पॅरालिम्पिक अनेकांना प्रेरणा देत आहे. तुझ्या प्रयत्नांना सलाम.
- राज्यवर्धनसिंग राठोड, निशानेबाज
स्वत:चाच विश्वविक्रम मोडण्यासाठी आणि देशाला गौरवान्वित करण्यासाठी देवेंद्र झझारियाला शुभेच्छा.
- रोहन बोपन्ना, टेनिसपटू
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या देवेंद्रच्या सुवर्ण कामगिरीनंतर भारत रिओ पॅरालिम्पिक पदक तालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. भारताच्या खात्यामध्ये आता दोन सुवर्ण आणि प्रत्येकी एक रौप्य व कांस्य अशी एकूण ४ पदकांची नोंद आहे.
राजस्थानचे क्रीडामंत्री गजेंद्रसिंग खिवसर यांनी देवेंद्रला ७५ लाख रोख रुपये, जयपूरमध्ये २२० मीटरचा प्लॉट आणि इंदिरा गांधी निहर योजना क्षेत्रात २५ बिघा जमीन देण्याची घोषणा केली.