भारताचे उपांत्य फेरीचे लक्ष्य
By admin | Published: July 5, 2017 01:55 AM2017-07-05T01:55:36+5:302017-07-05T01:55:36+5:30
सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून, आज (बुधवारी) आयसीसी महिला
डर्बी : सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून, आज (बुधवारी) आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत त्यांना श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ या लढतीत विजय मिळवित उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच करण्यास उत्सुक आहे.
फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जात आहे. श्रीलंका संघाची आतापर्यंतची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यांना तीनही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
फॉर्मचा विचार करता भारताने गेल्या चारही वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिका जिंकलेल्या आहेत. भारतीय संघाने या वाटचालीमध्ये मायदेशात श्रीलंका व विंडीजचा व्हाइटवॉश केला, तर दक्षिण आफ्रिकेला विश्वकप पात्रता स्पर्धा व चौरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत पराभवाचा तडाखा दिला. विश्वकप स्पर्धेत भारताने तिन्ही राऊंड रॉबिन लढतींमध्ये विजय मिळवला. भारतीय संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
भारताने सलामी लढतीत यजमान इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव करीत शानदार सुरुवात केली. त्यानतंर दुसऱ्या लढतीत विंडीजचा ७ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध गेल्या लढतीत ९५ धावांनी
विजय मिळवला. सलग तीन विजयांमुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. भारतीय संघाने तीन सामन्यांत सहा गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
पहिल्या दोन सामन्यांत फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध गेल्या लढतीत डावखुरी फिरकीपटू एकता बिष्टने १० षटकांत १८ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत, प्रतिस्पर्धी संघाचा डाव ३८.१ षटकांत ७४ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मधल्या षटकांमध्ये दीप्ती शर्माने अचूक मारा केला. पूनम यादव व हरमनप्रीत कौर यांचीही गोलंदाजी उल्लेखनीय ठरली.
वन-डे इतिहासात आतापर्यंत सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरलेल्या झुलन गोस्वामीला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, पण पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा भार तिच्याच खांद्यावर राहणार आहे. फलंदाजीमध्ये सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना शानदार फॉर्मात आहे. कर्णधार मिताली राज व पूनम राऊत यांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता श्रीलंका संघ विजयाचे खाते उघडण्याची प्रतीक्षा करीत आहे. श्रीलंकेला सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध ९ गड्यांनी, आॅस्ट्रेलियाविरुद्ध ८ गड्यांनी आणि इंग्लंडविरुद्ध ७ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. श्रीलंका संघाला फलंदाजीमध्ये सर्वाधिक आशा चामरी अटापट्टूकडून आहे. तिने न्यूझीलंडविरुद्ध ५३ तर आॅस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७८ धावांची खेळी केली होती. पण संघाला विजय मिळवून देण्यात तिचे प्रयत्न अपुरेच पडले. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
भारत :- मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिष्ट, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि नुजहत प्रवीण.
श्रीलंका :- इनोका रानावीरा (कर्णधार), चामरी अटापट्टू, चंदिमा गुणारत्ने, निपुनी हंसिका, अमा कंचना, ईशानी लोकुसूर्या, हर्षिता माधवी, दिलानी मनोदरा, हासिनी परेरा, चामरी पोलगमपाला, उदेशिका प्रबोधिनी, ओशादी रानासिंघे, शशिकला श्रीवर्देना, प्रसादिनी वीराकोडी आणि श्रीपाली वीराकोडी.