भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश
By admin | Published: October 19, 2016 04:32 AM2016-10-19T04:32:18+5:302016-10-19T04:32:18+5:30
बलाढ्य व संभाव्य विजेत्या भारताने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करताना इंग्लंडला ६९-१८ असे लोळवले.
अहमदाबाद : बलाढ्य व संभाव्य विजेत्या भारताने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करताना इंग्लंडला ६९-१८ असे लोळवले. यासह ‘अ’ गटातून यजमान भारत आणि कोरियाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
अत्यंत एकतर्फी झालेल्या या लढतीत भारताने अपेक्षित विजय मिळवताना इंग्लंडला सहजपणे नमवले. उपांत्य फेरी निश्चित करण्यासाठी भारतीयांना विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. इंग्लंडचा दुबळा बचाव आणि कमजोर आक्रमण याचा चांगलाच समाचार घेताना भारतीयांनी इंग्लंडला कबड्डीचे धडेच दिले.
स्टार खेळाडू प्रदीप नरवाल (१३) आणि अजय ठाकूर (११) यांनी तुफानी खेळ करताना इंग्लंडचा पराभव स्पष्ट केला. मध्यंतरालाच ४५-६ अशी जबरदस्त आघाडी घेत भारतीयांनी सामन्याचा निकाल स्पष्ट केला. सुरजीत, सुरेंदर नाडा यांनी भक्कम पकडी करताना इंग्लंडच्या आक्रमणाला रोखले. तसेच संदीप नरवालचा अष्टपैलू खेळ, राहुल चौधरी व नितीन तोमरचे आक्रमणदेखील निर्णायक ठरले.
इंग्लंडवर तब्बल ५ लोण चढवताना भारताने सामन्यावर एकहाती नियंत्रण राखले. इंग्लंडकडून कर्णधार सोमेश्वर कालिया (७), केशव गुप्ता (५) आणि टोपे अडेवलुरे (४) यांनी अपयशी झुंज दिली. (वृत्तसंस्था)
>केनियाच्या आशा कायम...
केनियाने उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवताना दुबळ्या अमेरिकेचा ७४-१९ असा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह केनियाने ‘ब’ गटात १६ गुण मिळवले आहे. उपांत्य फेरीसाठी केनियाला, थायलंडविरुद्ध जपान विजयी होणे आवश्यक आहे. मात्र, १५ गुणांसह तिसऱ्या स्थानी असलेले थायलंड विजयी झाल्यास केनिया व जपानचे आव्हान संपुष्टात येईल. कर्णधार डेव्हीड मोसाम्बायी आणि फिलिक्स ओपाना यांनी अनुक्रमे १२ व ११ गुणांची लयलूट करताना अमेरिकेच्या आव्हानातली हवा काढली. जेम्स ओबिलो आणि ओधिआम्बो ओगाक यांनी मजबूत पकडी केल्या. मध्यंतरालाच केनियाने ३८-८ असे वर्चस्व राखत अमेरिकेचे मानसिक खच्चीकरण केले.