दुसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
By admin | Published: January 29, 2016 05:55 PM2016-01-29T17:55:52+5:302016-01-29T18:06:03+5:30
दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २७ धावांनी पराभव करत ३ सामन्याच्या मालिकेत २-० ने आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २९ - दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २७ धावांनी पराभव करत, ३ सामन्यांची मालिका २-० अशी आघाडी घेत जिंकली आहे. रोहित शर्मा (६०) आणि विराट कोहलीच्या (५९) धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाला २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १५७ धावापर्यंत मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियातर्फे कर्णधार फिंचने एकतर्फी लढत दिली. फिंचने ४८ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकाराच्या मदतीने ७४ धावा केल्या. कर्णधार फिंच आणि शॉन मार्श यांनी चांगली सलामी दिल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना त्याचा फायदा उचलता आला नाही, फिंच आणि मार्श यांनी १० षटकात ९८ धावांची भागीदारी केली, पण अश्विनने मार्शला बाद करत कागारूंच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले आणि भारताने सामना २७ धांवानी जिंकला. शॉन मार्श (२३), ख्रिस लिन (२), ग्लेन मॅक्सवेल(१), शेन वॉटसन (१५), मॅथ्यू वेड ( नाबाद१६), जेम्स फॉकनर (१०), जॉन हेस्टिंग्ज(४), अँड्रयू टाय (४) धावावर बाद झाले. भारतातर्फे जडेजा आणि बुमरहा यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले, तर अश्विन, युवराज आणि पांड्या यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला तंबूत पाठवले.
त्यापुर्वी, मालिका वाचविण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या दुस-या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या. शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला.