भारताचा लाजिरवाणा पराभव

By admin | Published: August 18, 2014 02:11 AM2014-08-18T02:11:51+5:302014-08-18T02:11:51+5:30

ओल्ड ट्रॅफर्डपाठोपाठ भारतीय संघाने ओव्हलमध्ये पुन्हा तोच पाढा गिरवला. अवघ्या अडीच दिवसांत इंग्लंड गोलंदाजांसमोर भारताचे महारथी ढेपाळले

India's shameful defeat | भारताचा लाजिरवाणा पराभव

भारताचा लाजिरवाणा पराभव

Next

लंडन : ओल्ड ट्रॅफर्डपाठोपाठ भारतीय संघाने ओव्हलमध्ये पुन्हा तोच पाढा गिरवला. अवघ्या अडीच दिवसांत इंग्लंड गोलंदाजांसमोर भारताचे महारथी ढेपाळले. पाचव्या कसोटीत इंग्लंडने १ डाव व २४४ धावांनी विजय मिळवून मालिका ३-१ अशी जिंकली. डावाने विजय साजरा करण्याची इंग्लंडची ही ९९वी वेळ ठरली, तर सलग दोन डावाने पराभव पत्करण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली. डावाने पराभव टाळण्यासाठी ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव इंग्लंडने ९४ धावांवर गुंडाळला.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पत्करलेला हा सर्वांत लाजिरवाणा पराभव आहे. यापूर्वी २०११मध्ये बर्मींघॅम कसोटीत धोनीला एक डाव व २४२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तर परदेशात २८ कसोटींत धोनीला १४ पराभव पत्करावे लागलेत, या लाजिरवाण्या विक्रमाबरोबर धोनीने दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली होती. देहबोलीतून त्यांनी पराभव पत्करला असल्याचे जाणवत होते. केवळ औपचारिकता म्हणून ते फलंदाजीला आले होते. याच निराशाजनक देहबोलीने त्यांचा घात केला. पाचव्या षटकात अ‍ॅण्डरसनने मुरली विजयला बाद केले आणि भारताच्या डावाला सुरुंग लावला. भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळालेल्या गौतम गंभीरलाही अति घाई नडली. सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या नादात तो धावबाद झाला. अशा या बाद होण्याने त्याची कसोटी कारकिर्द जवळपास संपुष्टात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यानंतर फॉर्मशी झगडत असलेले चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली काही धडपड दाखवतील अशी अपेक्षाही फोल ठरली. अ‍ॅण्डरसनने टाकलेल्या चेंडूचा अंदाज कदाचित पुजाराला घेता आला नाही आणि तो बटलरच्या हातात झेल देऊन परतला. अजिंक्य रहाणेनेही निराशा
केली. तारणहार महेंद्रसिंग धोनीला तर क्रिस वोक्सने भोपळाही फोडू दिला नाही.
खराब फॉर्माने कोहलीचा पाठलाग काही सोडला नाही. ५४ चेंडू खेळल्यानंतर कोहली मोठी खेळी करेल असे वाटले होते, परंतु जॉर्डनच्या गोलंदाजीवर त्याने कुकच्या हातात झेल दिला. कोहली गेल्यानंतर भारताच्या उरलेल्या आशाही मावळल्या. स्टुअर्ट बिन्नी वगळता तळाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. जॉर्डनने भारताचे शेपूट गुंडाळले. भारताचा दुसरा डाव ९४ धावांत गुंडाळून इंग्लंडने तिसऱ्याच दिवशी १ डाव व २४४ धावांनी विजय साजरा केला. भारताला दोन्ही डावांत मिळून इंग्लंडच्या ४८६ धावांची निम्मी धावसंख्याही पार करता आली नाही. इंग्लंडकडून जॉर्डनने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या, तर अ‍ॅण्डरसन २, ब्रॉड आणि वोक्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. शतकवीर जो रुट याला ‘सामनावीर’, तर जेम्स अ‍ॅण्डरसन आणि भुवनेश्वर कुमार यांना ‘मालिकावीर’ म्हणून गौरविण्यात आले.

Web Title: India's shameful defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.