भारताचा लाजिरवाणा पराभव
By admin | Published: June 19, 2015 02:23 AM2015-06-19T02:23:43+5:302015-06-19T02:23:43+5:30
बांगलादेश दौऱ्याच्या माध्यमातून यंदाच्या मोसमाचा श्रीगणेशा करणाऱ्या टीम इंडियाची अखेर पराभवाने सुरुवात झाली. तुलनेने दुबळ्या
मिरपूर : बांगलादेश दौऱ्याच्या माध्यमातून यंदाच्या मोसमाचा श्रीगणेशा करणाऱ्या टीम इंडियाची अखेर पराभवाने सुरुवात झाली. तुलनेने दुबळ्या असलेल्या बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३०७ धावांची मजल मारल्यानंतर बलाढ्य भारताचा डाव केवळ २२८ धावांवर संपुष्टात आणून ७९ धावांनी शानदार बाजी मारली. या विजयासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी १-० अशी आघाडी घेतली आहे. मुस्तफीजूर रहमान याने ५० धावांत ५ बळी घेताना भारतीयांचे कंबरडे मोडले.
शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने दिलेल्या ३०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज सुरुवातीपासूनच अडखळताना दिसले. भलेही रोहित शर्मा - शिखर धवन यांनी ९५ धावांची सलामी दिली असली, तरी ते बांगला माऱ्यापुढे अक्षरश: चाचपडत होते. शर्मा - धवन यांचे फटके लागत नसल्याने भारताच्या धावसंख्येला खीळ बसली होती. शर्माने सर्वाधिक ६३ धावांची खेळी करताना भारताकडून अपयशी झुंज दिली. यासाठी त्याने ६८ चेंडूंचा सामना करताना केवळ ४ चौकार व एक षटकार खेचला, तर धवन ३८ चेंडंूत ३ चौकांरासह ३० धावा काढून परतला.
भरवशाचा विराट कोहली (१), अजिंक्य रहाणे (९), कर्णधार महेंद्रसिंह धोनी (५) स्वस्तात परतल्याने भारताच्या आव्हानातली हवाच निघून गेली. त्यातल्या त्यात सुरेश रैना (४० चेंडंूत ४० धावा) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (४२ चेंडंूत ३२ धावा) यांनी थोडाफार प्रतिकार केल्याने भारताचा पराभव लांबला. तसेच तळाला भुवनेश्वर कुमार (नाबाद २५) आणि मोहित शर्मा (११) यांनी कडवा प्रतिकार केला.
रहमान व्यतिरिक्त तस्कीन अहमद आणि शाकीब अल हसन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर, कर्णधार मुशर्रफ मूर्तझा याने एक बळी घेताना बांगलादेशच्या शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी बांगलादेश संघाचा कर्णधार मुशर्रफी मुर्तझाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फलंदाजांनी योग्य ठरवला. सुरुवातीला त्यांच्या तमीम इक्बाल व सौम्या सरकार यांनी १०२ धावांची भक्कम भागीदारी करून संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे काही काळ खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर बांगलादेशने २३ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट गमावल्या. पण, शकिब (५२), शब्बीर रहमान (४१) व नासिर हुसेन (३४) यांनी बांगलादेशला आव्हानात्मक मजल मारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शाकिब व शब्बीर यांनी पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. आश्विन भारतातर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तमीमने सुरुवातीला भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने यादवच्या एका षटकात ३ चौकार व १ षटकार १८ धावा वसूल केल्या. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या सात षटकांत ५ बळी घेतले; पण बांगलादेशला ३०० धावांत रोखण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)
धावफलक..
बांगलादेश : तमीम इक्बाल झे. रोहित गो. आश्विन ६०, सौम्या सरकार धावबाद ५४, लिट्टन दास पायचित गो. आश्विन ८, मुशफिकर रहीम झे. रोहित गो. आश्विन १४, शाकीब अल हसन झे. जडेजा गो. उमेश ५२, शब्बीर रहमान त्रि. गो. जडेजा ४१, नासीर हुसेन झे. जडेजा गो. उमेश ३४, मशरफी मुर्तजा झे. रोहित गो. मोहित २१, रुबेल हुसेन झे. मोहित गो. भुवनेश्वर ४, तस्किन अहमद झे. कोहली गो. भुवनेश्वर २, मुस्ताफिजुर रहमान नाबाद ०. अवांतर : १७. एकूण : ४९.४ षटकांत सर्व बाद ३०७. बाद क्रम : १-१०२, २-१२३, ३-१२९, ४-१४६, ५-२२९, ६-२६७, ७-२८२, ८-२८६, ९-२९८. गोलंदाजी : भुवनेश्वर ७-०-३७-२, उमेश यादव ८-०-५८-२, आश्विन १०-०-५१-३, मोहित ४.४-०-५३-१, रैना १०-०-४०-०, जडेजा ८-०-४८-१, कोहली २-०-१२-०.
भारत : रोहित शर्मा झे. मुशर्रफ मूर्तझा गो. मुस्तफिजूर रहमान ६३, शिखर धवन झे. मुशफिकिर रहिम गो. तस्किन अहमद ३०, विराट कोहली झे. मुशफिकिर रहिम गो. तस्किन अहमद १, अजिंक्य रहाणे झे. नासीर हुसेन गो. मुस्तफिजूर रहमान ९, सुरेश रैना त्रि. गो. मुस्तफिजूर रहमान ४०, महेंद्रसिंह धोनी झे. मुशफिकिर रहिम गो. शाकिब अल हसन ५, रवींद्र जडेजा झे. सौम्या सरकार गो. मुस्तफिजूर रहमान ३२, आर. अश्विन झे. मुशफिकिर रहिम गो. मुस्तफिजूर रहमान ०, भुवनेश्र्वर कुमार नाबाद २५, मोहित शर्मा झे. मुशफिकिर रहिम गो. मुशर्रफ मूर्तझा ११, उमेश यादव पायचीत गो. शाकिब अल हसन २; अवांतर : १०; एकूण : ४६ षटकांत सर्वबाद २२८; गोलंदाजी :मुस्तफिजूर रहमान ९.२-१-५०-५, तस्किन अहमद ६-१-२१-२, मुशर्रफ मूर्तझा १०-०-५३-१, रुबेल हुसेन ६-०-३६-०, नासीर हुसेन ६.४-०-३१-०, शाकिब अल हसन ८-०-३३-२