भारताचे शिलेदार विजयासाठी उतरणार
By admin | Published: January 28, 2016 01:47 AM2016-01-28T01:47:24+5:302016-01-28T01:47:24+5:30
१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, गुरुवारी भारतीय संघ ‘ड’ गटात आयर्लंडविरुद्ध मोठ्या विजयासाठीच मैदानात उतरणार आहे.
मिरपूर : १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, गुरुवारी
भारतीय संघ ‘ड’ गटात आयर्लंडविरुद्ध मोठ्या विजयासाठीच मैदानात उतरणार आहे. दिग्गज भारतीय फलंदाज राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ या स्पर्धेची सुरुवात मोठ्या विजयासह करण्यास उत्सुक असेल.
भारताने यापूर्वी तीन वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावलेले आहे. भविष्यातील क्रिकेट खेळाडू शोधण्याच्या दृष्टीने या स्पर्धेकडे पाहिले जाते. या स्पर्धेतून भारताला विराट कोहली, युवराज सिंग यासारखे खेळाडू मिळाले आहेत. यावेळीही इशान किशन, रिषभ पंत, अवेश खान हे खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव आॅस्ट्रेलियाने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. यामुळे या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी भारताला फार
मोठी संधी आहे. भारतीय संघातील पाच खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. यावरूनच भारतीय संघाची ताकद लक्षात येते.
अन्य खेळाडूंत सर्फराज खान आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजरर्सकडून खेळत आहे. सर्फराजची ही दुसरी स्पर्धा आहे.
सलामीवीर रिषभ पंत याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असेल. १९ वर्षांखालील स्पर्धेत आतापर्यंतची त्याची कामगिरी चांगली असून, आयपीएलच्या लिलावाच्या दुसऱ्या सत्रासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो. कर्णधार इशान किशन झारखंडकडून प्रथम श्रेणी
क्रिकेट खेळतो. (वृत्तसंस्था)