भारताचे समाधान रौप्यपदकावर
By admin | Published: May 27, 2016 03:55 AM2016-05-27T03:55:39+5:302016-05-27T03:55:39+5:30
पाकिस्तानला सहजपणे लोळवून अंतिम फेरी गाठलेल्या भारताला बलाढ्य इराणविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागल्याने अखेर आशियाई स्नूकर सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकावर
मुंबई : पाकिस्तानला सहजपणे लोळवून अंतिम फेरी गाठलेल्या भारताला बलाढ्य इराणविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागल्याने अखेर आशियाई स्नूकर सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. २-२ अशी बरोबरी झाल्यानंतर निर्णायक लढतीत आदित्य मेहता पराभूत झाल्याने भारताचे सुवर्ण हुकले.
अबुधाबी येथे झालेल्या या रोमांचक अंतिम सामन्यात भारताची सुरुवात सकारात्मक झाली. आदित्य मेहताने चुरशीच्या झालेल्या एकेरी लढतीत आमीर सरकोशला ६५-५३ असे नमवून भारताला १-० असे आघाडीवर नेले. मात्र, यानंतर भारताला मोठा झटका बसला. इराणच्या सोहेल वाहेदीने अनपेक्षित बाजी मारताना पंकज अडवाणीचा ५४-७ असा दणदणीत पराभव करून बरोबरी साधली.
दुहेरी लढतीतही भारताला मोठा झटका बसला. एकतर्फी झालेल्या या लढतीत आमीर व सोहेल या जोडीने एकहाती वर्चस्व राखताना आदित्य - पंकज यांना ७७-१ असा धक्का देत २-१ अशी आघाडी घेतली. यानंतरच्या एकेरी लढतीत पंकजने भारताला बरोबरी साधून देत आमीर सरकोशचा ६९-६४ असा पाडाव करून सामना पाचव्या लढतीत नेला. या निर्णायक लढतीत आदित्य पराभूत झाल्याने भारताचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.