चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर,रोहित शर्मा, शामीचे पुनरागमन
By admin | Published: May 8, 2017 12:21 PM2017-05-08T12:21:41+5:302017-05-08T14:19:48+5:30
नवी दिल्लीत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत पंधरा सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये होणा-या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी सोमवारी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी यांनी संघात पुनरागमन केले आहे. ऑक्टोंबरनंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच एकदिवसीय संघात खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेत दुखापत झाल्यापासून रोहित संघाबाहेर होता. सध्या चालू असलेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने 10 डावात फक्त 183 धावा केल्या आहेत.
वर्ल्डकप 2015 मधील उपांत्यफेरीच्या सामन्यानंतर मोहोम्मद शामी एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात एकूण पाच वेगवान गोलंदाज आहेत. मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि हार्दिक पंडया. आयपीएलच्या पाच सामन्यात शामीला फक्त दोन विकेट मिळाल्या आहेत. ही उत्साहवर्धक कामगिरी नसली तरी, निवड समितीने शामीवर विश्वास दाखवला आहे. मागच्यावर्षी जुलै महिन्यात त्याने भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले होते.
जानेवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध मायदेशात भारतीय संघ एकदिवसीय मालिका खेळला होता. अमित मिश्राच्या जागी शामीला संधी मिळाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि लोकेश राहुल डावाची सुरुवात करतील. संघ निवडताना सुरेश रैना, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, रिषभ पंत आणि शारदुल ठाकूर यांच्या नावाचाही विचार झाला अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिली.
आयपीएल संपल्यानंतर पाच खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षणासाठी जातील. आयसीसी बरोबर आर्थिक मुद्यावरुन मतभेद झाल्यामुळे भारतीय संघाच्या स्पर्धेतील समावेशाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. पण रविवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. 25 एप्रिल ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडण्याची अंतिम मुदत होती. पण बीसीसीआयने मतभेदांमुळे संघ निवडण्यास उशिर केला. इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.
आयसीसीने वादग्रस्त ‘बिग थ्री’ प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केल्यामुळे बीसीसीआयला मिळणारा महसूल जवळजवळ अर्ध्यावर आला आहे. त्याचप्रमाणे बीसीसीआयच्या कार्यकारी अधिकारांमध्येही कपात झाली आहे. बीसीसीआयच्या राजकारणातून बाहेर करण्यात आलेल्या आणि आक्रमक पवित्रा स्वीकारण्यास उत्सुक असलेल्या एन. श्रीनिवासन गटासाठी हा मोठा धक्का आहे. आपले मत मांडण्यासाठी श्रीनिवासन स्काईपच्या माध्यमातून चर्चेत सहभागी झाले होते, पण त्यांनी विरोधाची भूमिका घेतली नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), युवराज सिंग, केदार जाधव, हार्दीक पंडया, आर.अश्विन, रविंद्र जाडेजा, उमेश यादव, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मनीष पांडे.