भारताची भक्कम आघाडी

By admin | Published: February 4, 2017 12:56 AM2017-02-04T00:56:33+5:302017-02-04T00:56:33+5:30

पुण्यामध्ये ४३ वर्षांनंतर होत असलेल्या भारत-न्यूझीलंड डेव्हीस चषक टेनिस स्पर्धेच्या लढतीतील पहिल्या दिवशी दोन्ही लढती जिंकून यजमान संघाने वर्चस्व गाजविले. युकी भांबरी आणि रामकुमार

India's strong lead | भारताची भक्कम आघाडी

भारताची भक्कम आघाडी

Next

- अमोल मचाले,  पुणे
पुण्यामध्ये ४३ वर्षांनंतर होत असलेल्या भारत-न्यूझीलंड डेव्हीस चषक टेनिस स्पर्धेच्या लढतीतील पहिल्या दिवशी दोन्ही लढती जिंकून यजमान संघाने वर्चस्व गाजविले. युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांनी अपेक्षेप्रमाणे एकेरीतील आपापले सामने जिंकून आशिया-ओशनिया गटाच्या लढतीत शुक्रवारी भारताला २-० अशी आघाडी घेतली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही लढत आजपासून सुरू झाली. पहिल्या दिवशीच्या एकेरी लढतींत भारतीय खेळाडूंचे पारडे जड मानले जात होते आणि घडलेही तसेच. पहिल्या एकेरी लढतीत युकी भांबरीने फिन टिअर्नी याच्यावर ६-४, ६-४, ६-३ने सरशी साधत भारताला विजयी प्रारंभ करवून दिला. रामकुमारनेही युकीचा कित्ता गिरवताना जोस स्टॅथमचा प्रतिकार ६-३, ६-४, ६-३ने मोडून काढत दिवसाच्या खेळावर भारताची मोहोर ठळकपणे उमटवली.
भारताच्या नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंपैकी एक असलेला दिल्लीचा २४ वर्षीय युकी आज अपेक्षेनुरूप सफाईदार खेळ करू शकला नाही. असे असले तरी, टिअर्नीला पराभूत करण्यासाठी त्याला फारसा घाम गाळावा लागला नाही. जागतिक क्रमवारीत युकी ३६८व्या , तर टिअर्नी ४१४व्या क्रमांकार आहे. हे पाहता युकीचे पारडे जड होते. मात्र, पहिल्या दोन्ही सेटच्या प्रारंभी युकी माघारला होता. मात्र, यानंतर त्याने झुंजार खेळ करीत जबरदस्त कमबॅक केले.

असा जिंकला युकी...
पहिल्या सेटमध्ये ४ गेमनंतर युकी १-३ने माघारला होता. त्यावेळी तुरळक संख्येने उपस्थित असलेल्या भारतीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अनेक युवा खेळाडू युकीला प्रोत्साहन देत होते. युकीने यानंतर रुुंजार खेळ करीत सलग ४ गेम जिंकले आणि ५-३ने आघाडी घेतली. नववा गेम टिअर्नीने आपल्या नावे केल्याने उत्सुकता ताणली गेली होती. अखेर १०व्या गेममने युकीने मारलेला फोरहण्डचा फटका ४७ मिनिटे चाललेला हा सेट त्याच्या नावे करणारा ठरला.
दुसऱ्या सेटच्या प्रारंभीही २६ वर्षीय टिअर्नी जोरात होता. त्याने २-०ने आघाडी घेतली होती. यानंतर सलग ४ गेम जिंकून युकीने खेळाचे पारडे आपल्या बाजूने झुकविले. पुढील दोन्ही गेममध्ये उभय खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्याने स्कोअर ५-३ असा युकीच्या बाजूने होता. पुढील गेममध्ये टिअर्नीने, तर त्यानंतर युकीने सरशी साधत हा सेट ६-४ने आपल्या नावे केला. १० व्या गेममध्ये युकीने डबल फॉल्ट केला. मात्र, टिअर्नीला त्याचा लाभ उचलता आला नाही.
तिसऱ्या सेटच्या सुरूवातीला दोन्ही खेळाडूंत चुरस पहायला मिळाली. १-१ अशी बरोबरी असताना युकीने मारलेला बॅकहॅण्ड नेटमध्ये गेला आणि टिअर्नीला २-१ने आघाडी मिळाली. पुढील गेममध्ये युकीने सर्व्हिस राखली. पाठोपाठ पाचवा गेम जिंकून युकीने ३-२ने आघाडी घेतली. या निर्णायक सेटमध्ये टिअर्नीने जोरदार खेळ करीत सामना लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या क्रॉस शॉट्ना सडेतोड उत्तर देत तसेच नेटजवळही बहारदार खेळ करीत युकीने सामना चौथ्या सेटमध्ये जाणार नाही, याची काळजी घेतली. भारतीय खेळाडूने उंचावरून फोरहॅण्डचा फटका लगावत आठव्या गेमअखेरीस ५-३ने आघाडी घेतली. नवव्या गेममध्ये युकीला मॅच पॉईट मिळताच ‘ भारतमाता की जय’ या घोषणेला प्रारंभ झाला. टिअर्नीला रिटर्न शॉट रेषेबाहेर जाताच उपस्थित प्रेक्षकांच्या जल्लोषाला उधाण आले.

रामकुमारनेही मारली बाजी
जागतिक क्रमवारीत २०६व्या स्थानी असलेल्या रामकुमारने ४१७व्या क्रमांकावरील स्टॅथमचे आव्हान ३ सेटमध्ये परतावले. प्रभावी सर्व्हिस आणि दीर्घ रॅलींच्या जोरावर त्याने ही लढत जिंकली. पहिला सेट सुमारे अर्ध्या तासात ६-३ने आपल्या नावे केल्यानंतर रामकुमारला दुसऱ्या सेटमध्ये मात्र स्टॅथमच्या आव्हानांचा सामना करावा लागला. या सेटमध्ये त्याच्याकडून अनेक डबल फॉल्ट आणि इतर चुका झाला. मात्र, १०व्या गेमध्ये आपली सर्व्हिस साधत रामकुमारने दुसरा सेटही ६-४ने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये वर्चस्व गाजवत रामकुमारने विजयावर शिक्कामोर्तब केले.

पेसच्या विश्वविक्रमाबाबत उत्सुकता
या लढतीच्या पहिल्या दिवशी प्रारंभी प्रेक्षकांची संख्या मर्यादित होती. नंतर मात्र हळूहळू गर्दी वाढली. दुसऱ्या लढतीला प्रेक्षकांची संख्या लक्षणीय होती. युकीची लढत संपल्यानंतर थोडा वेळ ब्रेक होता. त्या वेळी महिला प्रेक्षकांमध्ये युकीच्या लूकची चर्चा होती. त्याहीपेक्षा जास्त उत्सुकता होती ती शनिवारी होणाऱ्या लिएंडर पेसच्या दुहेरीतील लढतीबाबत. ही लढत जिंकल्यास डेव्हीस चषक टेनिस स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे ४३ लढती जिंकण्याचा विश्वविक्रम पेसच्यास नावावर होईल. सध्या त्याच्या नावावर दुहेरीतील ४२ विजयांची नोंद आहे.

पुण्यात खेळणे आनंददायी आहे. माझी सुरुवात चांगली झाली नाही. पण नंतर एकाग्रता साधण्यात यशस्वी ठरलो. योग्य वेळी स्वत:वर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरल्याने सामना जिंकू शकलो. - युकी भांबरी

Web Title: India's strong lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.