भारतीयांचा दमदार प्रारंभ

By admin | Published: February 20, 2017 03:27 AM2017-02-20T03:27:28+5:302017-02-20T03:27:28+5:30

बांगलादेशाची राजधानी ढाका येथे सुरू असलेल्या विश्चषक रोलबॉल स्पर्धेत भारताच्या महिला तसेच पुरूष संघांनी अपेक्षेनुसार दमदार प्रारंभ केला

India's strong start | भारतीयांचा दमदार प्रारंभ

भारतीयांचा दमदार प्रारंभ

Next

पुणे : बांगलादेशाची राजधानी ढाका येथे सुरू असलेल्या विश्चषक रोलबॉल स्पर्धेत भारताच्या महिला तसेच पुरूष संघांनी अपेक्षेनुसार दमदार प्रारंभ केला. महिला संघाने सिरीयाला २२-०ने लोळविले, तर पुरूष संघाने प्रथम ओमानवर १०-०ने आणि दुसऱ्या लढतीत आयव्हरी कोस्टवर ९-४ने मात केली.
शेख रसूल रोलबॉल स्टेडियम येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत महिला गटातील आपल्या पहिल्या लढतीत सिरीयाविरूद्ध भारताची कर्णधार ऐश्वर्या सावंतने शानदार कामगिरीसह ५ गोल केले. के. कृतिकाने ३ तर श्वेता कदम, सुस्मिता, क्रितिका चौहान, रिंकू सोनीने, अनिशा नायर, अंजली नायर यांनी प्रत्येकी २ गोल करीत विजयामध्ये योगदान दिले.
पुरुषांच्या गटातील पहिल्या लढतीत झालेल्या लढतीमध्ये मिहीर साने याने ३, तर कर्णधार आदित्य गणेशवाडे व रोहन दाभाडे यांनी प्रत्येकी २ गोल करीत विजयात निर्णायक योगदान दिले. शुभम शेवते, हरेश्वरसिंग आणि ओम शिव ओम यांनीही प्र्रत्येकी १ गोल केला.
दुसऱ्या सामन्यात आयव्हरी कोस्ट संघाने उत्तरार्धात केलेला प्रतिकार भारतीय खेळाडूंनी थिटा ठरविला. ओम शिव ओम आणि हितेश्वरसिंग यांनी प्रत्येकी २ गोल करीत ६ मिनिटांच्या आत भारताला ४-०ने आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात विजयी संघ ५-०ने आघाडीवर होता. उत्तरार्धात कर्णधार आदित्य गणेशवाडेने सलग ३, तर मिहीर साने याने १ गोल करीत भारताची आघाडी ९-१अशी वाढविली. आयव्हरी कोस्टच्या खेळाडूंनी ६ मिनिटांच्या आत ३ गोल करून सामन्यात थोडी रंगत आणली. मात्र, ते भारताला विजयापासून राखू शकले नाही. (क्रीडा प्रतिनिधी)


निकाल


महिला : भारत : २२ (ऐश्वर्या सावंत ५, के. कृतिका ३, श्वेता कदम, सुस्मिता, क्रितिका चव्हाण, रिंकू सोनी, अनिशा नायर, अंजली नायर प्रत्येकी २ गोल) विवि सिरीया : ०.
पुरूष : भारत : १० (मिहीर साने ३, आदित्य गणेशवाडे २, रोहन दाभाडे २, शुभम शेवते १, हरेश्वरसिंग १, ओम शिव ओम १) विवि ओमान : ०.
भारत : ९ (आदित्य गणेशवाडे ३, ओम शिव ओम २, हरेश्वरसिंग २, सी. आर. फिलीप १, मिहीर साने १) विवि आयव्हरी कोस्ट : ४ (कौडिओ क्रायरिल ४).

Web Title: India's strong start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.