चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतच बलवान संघ - कुमार संगकारा
By admin | Published: May 30, 2017 02:35 PM2017-05-30T14:35:48+5:302017-05-30T14:45:40+5:30
ले. भारताकडे संतुलित संघ असून वेगवान गोलंदाजीमुळे भारताच्या जेतेपदाची शक्यता अधिक आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. 30 - गतविजेता भारतच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारताकडे जेतेपद कायम राखण्याची क्षमता आहे असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केले. भारताकडे संतुलित संघ असून वेगवान गोलंदाजीमुळे भारताच्या जेतेपदाची शक्यता अधिक आहे असे संगकाराने सांगितले. यंदाच्यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आशियातून चार संघ सहभागी झाले असून, भारताचा संघ सर्वाधिक सशक्त आहे.
2013 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आताही भारतामध्ये विजेतेपद मिळवण्याची क्षमता आहे असे संगकाराने आयसीसीच्या वेबसाईटवर लिहीलेल्या स्तंभामध्ये म्हटले आहे. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा हे भारताचे फिरकी गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपयुक्त कामगिरी करत असून, कर्णधार विराट कोहली भले आयपीएलमध्ये अपयशी ठरला असेल पण इथे तो दमदार कामगिरी करेल असे संगकाराला विश्वास वाटतो.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उपांत्यफेरीचे सामने रंगतील असे भाकीत संगकाराने वर्तवले आहे. श्रीलंकेने 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती तर, 2014 मध्ये टि-20 वर्ल्डकप जिंकला होता. संगकाराने दोनवर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून संगकाराने 28,016 धावा केल्या आहेत.
काही काळापूर्वी एक ते दोन संघांचेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व होते. पण आता अनेक संघांनी आपल्यामध्ये प्रगती केली असून, चार ते पाच संघ समानपातळीचे आहेत असे संगकाराने म्हटले आहे. इंग्लंडच्या एकदिवसीय संघाने मागच्या दोनवर्षात चांगली प्रगती केली आहे. रणनिती आणि अन्य आघाडयांवर हा संघ इतरांपेक्षा पिछाडीवर असायचा पण आता त्यांनी चांगली प्रगती केली आहे. इंग्लंडसंघामध्ये गुणवान खेळाडू असून ते आक्रमक क्रिकेट खेळत आहेत असे संगकाराने सांगितले. 1 जून पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून, भारताचा सलामीचा सामना 4 जूनला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
रोहित सलामीसाठी सज्ज
रोहित शर्मा सलामीवीर म्हणून पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी भारतीय संघ आज (मंगळवारी) बांगलादेशविरुद्ध अखेरचा सराव सामना खेळणार आहे. या लढतीच्यानिमित्ताने रोहितला सलामीवीर म्हणून सराव करण्याची चांगली संधी मिळणार आहे.