भारताची आश्वासक सुरुवात
By admin | Published: August 19, 2016 12:52 AM2016-08-19T00:52:59+5:302016-08-19T00:52:59+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या व अंतिम कसोटी सामन्यात विजय आवश्यक
पोर्ट आॅफ स्पेन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या व अंतिम कसोटी सामन्यात विजय आवश्यक असलेल्या टीम इंडियाने पहिल्या दिवशी आश्वासक सुरुवात करताना यजमानांची २ बाद ६२ धावा अशी अवस्था केली. इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेताना विंडिजला सुरुवाती झटके दिले. दरम्यान, तिसऱ्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही पावसाने पहिल्याच दिवशी व्यत्यय आणल्याने २२ व्या षटकानंतर खेळ थांबविण्यात आला.
क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर सुरु असलेल्य या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतरही चांगली सुरुवात केली. याआधी चार सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेल्या भारताला आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी चौथ्या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. त्यातच गोलंदाजांनी केलेल्या अचूक कामगिरीच्या जोरावर आक्रमक सुरुवात केलेल्या टीम इंडियाने आपला इरादा स्पष्ट केला.
क्रेग ब्रेथवेट आणि लिआॅन जॉन्सन या सलामीवीरांनी सावध भूमिका घेत भारतीय गोलंदाजीचा आणि खेळपट्टीचा अंदाज घेतला. हे दोघे विंडिजला दमदार सुरुवात करुन देणार असे दिसत असतानाच इशांत शर्माने जॉन्सनला रोहित शर्माकरवी झेलबाद करुन भारताला पहिले यश मिळवून दिले.
जॉन्सनने ३० चेंडूत एका चौकारासह केवळ ९ धावा केल्या. तर, यानंतर काहीवेळाने हुकमी गोलंदाज अश्विनने आपली जादू दाखवताना विंडिजचा प्रमुख फलंदाज डॅरेन ब्रावोला त्रिफळाचीत केले. त्याने १० चेंडूत २ चौकारांसह १० धावा काढल्या.
पावसामुळे २२ व्या षटकात खेळ थांबविण्यात आला तेव्हा, ब्रेथवेट ७८ चेंडूत ५ चौकारांसह ३२ धावांवर खेळत होता. तर, अनुभवी मार्लेन सॅम्युअल्स त्याला चांगली साथ देत नाबाद ७ धावांवर टिकून आहे. (वृत्तसंस्था)
धावफलक :
वेस्ट इंडिज (पहिला डाव) : क्रेग ब्रेथवेट खेळत आहे ३२, लिआॅन जॉन्सन झे. रोहित गो. इशांत ९, डॅरेन ब्रावो त्रि. गो. अश्विन १०, मार्लेन सॅम्युअल्स खेळत आहे ४. अवांतर - ७. एकूण : २२ षटकात २ बाद ६२ धावा.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ६-१-१३-०; मोहम्मद शमी ६-२-१४-०; इशांत शर्मा ५-३-७-१; रविचंद्रन अश्विन ५-१-२२-१.