टी-२० वर्ल्डकपचा भारत प्रबळ दावेदार
By admin | Published: February 16, 2016 03:34 AM2016-02-16T03:34:47+5:302016-02-16T03:34:47+5:30
श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयामुळे उत्साहित असलेला भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने, मार्च महिन्यात भारताच्या यजमानपदाखाली प्रारंभ
विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयामुळे उत्साहित असलेला भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने, मार्च महिन्यात भारताच्या यजमानपदाखाली प्रारंभ होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत, भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.
२००७ मध्ये भारताला आपल्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवून देणारा धोनी म्हणाला, ‘टी-२० क्रिकेटमध्ये भारत जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.’ श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या लढतीत ९ गडी राखून विजय मिळवल्यानंतर, भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने सरशी साधली आणि टी-२० मध्ये क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले. विजयानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला,‘विश्वकप स्पर्धा भारताच्या यजमानपदाखाली होत आहे. या स्पर्धेत आमचे फिरकीपटू वर्चस्व गाजवतील. मायदेशात खेळण्याचा आम्हाला लाभ मिळेल. या व्यतिरिक्त आम्हाला येथे आयपीएल खेळण्याचा अनुभव आहे. आयपीएलच्या आठ पर्वांपैकी सात पर्व भारतातच खेळली गेली आहेत. आमच्या विश्वकप संघातील जवळजवळ सर्वच खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात आणि त्यांना येथे खेळण्याचा चांगला अनुभव आहे.’ भारताच्या यजमानपदाखाली ८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या विश्वकप स्पर्धेपूर्वी, गत टी-२० चॅम्पियन श्रीलंका संघाविरुद्धची ही मालिका यजमान संघाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात होती. या मालिकेत खेळणाऱ्या संघातील जास्तीत जास्त खेळाडूंचा आशिया व विश्वकप स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या संघात समावेश आहे. त्यामुळे खेळाडूंचा फॉर्म तपासण्यासाठी सर्वच खेळाडूंना फलंदाजीची संधी मिळाली आहे, असे धोनीने या वेळी स्पष्ट केले.
‘नव्या चेंडूने मारा करण्यासाठी अश्विनला आमची पहिली पसंती असते. तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना पुढे सरसावण्यास भाग पाडतो. टी-२० मध्ये अनेकदा फ्लॅट मारा करण्याची गरज असते, पण अश्विन अचूक मारा करतो. अश्विनमुळे आम्हाला वेगवान गोलंदाजांचा मधल्या षटकांमध्ये वापर करण्याची संधी मिळते.’
-महेंद्रसिंग धोनी
पॉवर प्ले महागात पडला
‘पॉवर प्ले’मध्ये चांगली कामगिरी न करता आल्यामुळे, विशेष अनुभव नसलेल्या आमच्या टी-२० संघाला भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. मालिकेत आम्ही चांगला खेळ केला. पहिल्या लढतीत आम्हाला सूर गवसला, पण दुसऱ्या व तिसऱ्या लढतीत आम्हाला चांगली सुरुवात करता आली नाही. रांचीमध्ये आम्ही पहिल्या सहा षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली नाही आणि अखेरच्या लढतीत पॉवर प्लेमध्ये चार विकेट गमावल्या. गेल्या दोन सामन्यांत आमच्याकडून चुका झाल्या.’ - दिनेश चंडिमल