भारताचे लक्ष्य अग्रस्थान
By admin | Published: September 30, 2016 05:04 AM2016-09-30T05:04:43+5:302016-09-30T05:07:38+5:30
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शुक्रवारी कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरेल
कोलकाता : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शुक्रवारी कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरेल, त्या वेळी यजमान संघाचे लक्ष्य मालिका विजयासह आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविण्याचे राहील.
भारताने मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात १९७ धावांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला. भारत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. ईडन गार्डनवर विजयाला भारतासाठी अधिक महत्त्व आहे. कारण, या विजयामुळे भारत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेईल. भारताने मालिका विजय साकारला, तर मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध १० वा मालिका विजय ठरेल. कसोटी मानांकनामध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाच्या तुलनेत भारत एका मानांकन गुणाने पिछाडीवर आहे. पाकिस्तान सध्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. ईडनवर विजय मिळवला, तर भारतीय संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेईल आणि २७ वर्षीय कर्णधार विराट कोहलीसाठी ही मोठी कामगिरी ठरेल.
त्याचप्रमाणे भारताचा हा मायदेशातील २५० वा कसोटी सामना आहे. कानपूरच्या ५०० व्या कसोटीप्रमाणे ही लढतही संस्मरणीय ठरवण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील आहे. भारतीय संघाला यंदाच्या मोसमात सर्वांत अधिक कसोटी मालिका खेळायच्या आहेत आणि न्यूझीलंडसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध विजयाने सुरुवात केली, तर संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल. (वृत्तसंस्था)