भारताचा लंकेवर दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2016 01:38 AM2016-02-13T01:38:21+5:302016-02-13T01:38:21+5:30

सलामीवीर शिखर धवनचे (५१) आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिलेवहिले तडाखेबंद अर्धशतक आणि त्याला उपयुक्त साथ दिलेल्या रोहित शर्मा (४३) यांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंकेचा

India's victory at Lanka | भारताचा लंकेवर दणदणीत विजय

भारताचा लंकेवर दणदणीत विजय

Next

रांची : सलामीवीर शिखर धवनचे (५१) आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिलेवहिले तडाखेबंद अर्धशतक आणि त्याला उपयुक्त साथ दिलेल्या रोहित शर्मा (४३) यांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंकेचा ६९ धावांनी धुव्वा उडवला. या महत्त्वपूृण विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
नाणेफेक जिंकून लंकेने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताने निर्धारीत २० षटकांत ६ बाद १९६ अशी आव्हानात्मक मजल मारली. दरम्यान, १९व्या षटकात थिसारा परेराने घेतलेल्या हॅट्ट्रीकमुळे भारताच्या धावसंख्येला खीळ बसली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना पाहुण्यांचा डाव ९ बाद १२७ धावांवर रोखताना संघाच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले. अश्विनने सुरुवातीला सलामीवीर तिलकरत्ने दिलशानला भोपळाही फोडू दिला नाही. तर अनुभवी आशिष नेहराने झ्टपट २ बळी घेताना लंकेची ३ बाद १६ धावा अशी केविलवाणी अवस्था केली. यानंतर कर्णधार दिनेश चंडीमल (३१), चमारा कपुगेदेरा (३२), मिलिंदा सिरीवर्दना (नाबाद २८) आणि दासून शनाका (२७) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीयांनी टिच्चून मारा करताना त्यांना अखेरपर्यंत दबावाखाली ठेवले. आर. अश्विनने ३, तर नेहरा आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी घेत लंकेला रोखले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना शिखर - रोहित लंकेच्या गोलंदाजीवर तुटून पडले. त्यांनी १२हून अधिक धावगतीने फटकेबाजी मारताना ७५ धावांची आक्रमक सलामी दिली. धवनने २५ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांच तडाखा दिला. दुशमंथ चमीराने धवनला बाद केले. यानंतर रोहितने अजिंक्य रहाणेच्या (२५) साथीने ४७ धावांची भागीदारी केली. पुन्हा एकदा चमीराने लंकेला यश मिळवून देताना आपल्याच गोलंदाजीवर रोहितचा अप्रतिम झेप घेतला. परेराने १९ वे निर्णायक षटक टाकताना अखेरच्या तीन चेंडूवर हार्दिक पांड्या, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांना बाद करुन भारतीयांना रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. ‘लोकल बॉय’ कर्णधार महेंद्रसिंग धोणीही अपयशी ठरला. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक :
भारत : २० षटकांत ६ बाद १९६ धावा (शिखर धवन ५१, रोहित शर्मा ४३, सुरेश रैना ३०; थिसारा परेरा ३/३३, दुशमंता चमीरा २/३८) वि.वि. श्रीलंका : २० षटकांत ९ बाद १२७ धावा (चमारा कपुगेदेरा ३२, दिनेश चंडिमल ३१, मिलिंदा सिरीवर्दना नाबाद २८; आर. अश्विन ३/१४, रविंद्र जडेजा २/२४, आशिष नेहरा २/२६)

Web Title: India's victory at Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.