भारताच्या विजयाची भिस्त फलंदाजांवरच!
By Admin | Published: January 29, 2017 04:48 AM2017-01-29T04:48:27+5:302017-01-29T04:48:27+5:30
कानपूरमधील पराभवामुळे भारतीय संघाचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारतीय फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली; पण मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना
- सुनील गावसकर लिहितो...
कानपूरमधील पराभवामुळे भारतीय संघाचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारतीय फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली; पण मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले. गोलंदाजांकडेही धावांचा बचाव करण्याची संधी कमीच होती.
मागच्या वेळी भारताने व्हीसीएवर न्यूझीलंडला सामना गमावला तेव्हा मिशेल सँटनर भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला होता. या वेळी खेळपट्टी अधिक चांगली असावी; पण ईडन गार्डन्स कोलकाता तसेच कानपूरच्या ग्रीन पार्कच्या तुलनेत येथे चेंडू अधिकच वळण घेईल, अशीही शक्यता आहे. अशा वेळी पाहुणा संघ आदिल राशीदला संधी देऊ शकतो. भारतीय संघाकडून आॅफ स्पिनर परवेझ रसूलच्या तुलनेत यजुवेंद्र चहल अधिक प्रभावी ठरू शकतो. तो अधिक वेगवान चेंडू टाकत असल्याने तितक्याच लवकर चेंडू वळण घेईल, अशी शक्यता आहे.
भारताच्या विजयाची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर असेल. फॉर्ममध्ये नसलेल्या केएल राहुलला नागपुरात मोठी खेळी करून चमक दाखविण्याची संधी असेल. युवराजला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही; पण आपल्या लौकिकानुसार फटकेबाजी करून षटकारांची आतषबाजी करावी इतकी माफक अपेक्षा चाहत्यांना त्याच्याकडून असेल. असे घडल्यास आतापर्यंतचे अपयश पुसून निघेल.
कानपूरमधील इंग्लंडचा विजय भारताच्या काळजीत भर पाडणारा ठरला. भारतीय फलंदाजांना कुठलीही संधी न देता प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी जो आक्रमक मारा केला, तो वाखाणण्यासारखा होता. भारतीयांना फटका मारण्याची संधी न देता इंग्लंडने सर्वच फलंदाजांना अलगद जाळ्यात अडकविले. इंग्लंडने कसोटी आणि वन डे मालिका गमावल्यानंतरही अखेरचा वन डे जिंकून आत्मविश्वास मिळविला होता. कानपूरचा सामना जिंकल्याने उत्साहात आणखीच भर पडली. आता इंग्लंड संघ टी-२० मालिका विजयाच्या जवळ पोहोचला आहे. मालिका जिंकल्यास पाहुणा आनंदी होऊन मायदेशी परत जाईल. दुसरीकडे इंग्लंडच्या आशेवर पाणी पाडायचे असेल तर भारतीय खेळाडूंना स्वत:च्या खेळाचा दर्जा उंचवावा लागेल.
(पीएमजी)