भारताचा 'विराट' विजय, अश्विनची अष्टपैलू खेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2016 11:33 PM2016-07-24T23:33:05+5:302016-07-25T04:07:23+5:30
रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू खेळी आणि इतर गोलंदाजांकडून त्याला मिळालेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ९२ धावांनी विराट विजय मिळवला.
Next
>
ऑनलाइन लोकमत
अँटिग्वा, दि. २५ : रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू खेळी आणि इतर गोलंदाजांकडून त्याला मिळालेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ९२ धावांनी विराट विजय मिळवला. त्याबरोबरच भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. दुसऱ्या डावात रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडीजची फलंदाजी ढेपाळली. भारताने फॉलोऑन दिल्यानंतर यजमान संघाने दुसऱ्या डावात ७८ षटकांत सर्वबाद २३१ धावा केल्या. या डावात आश्विनने सात बळी घेतले. ३३ सामन्यांत त्याने १७ वेळा ही कामगिरी केली. परदेशात ५ विकेट घेण्याची त्याची पहिली वेळ आहे. तर वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्यांदा ही कामगीरी केली आहे.
पहिल्या डावांत भारताने विराट कोहलीचे द्विशतक आणि आश्विनचे शतक या जोरावर ५६६ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर वेस्ट इंडीजचा पहिला डाव २४३ धावांतच आटोपला. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट याने चिवटपणे खेळ करीत ७४ धावा केल्या. सावधपणे खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या क्रेगने ७४ धावा करताना तब्बल २१८ चेंडू खेळले. मात्र, इतर फलंदाजांची त्याला साथ लाभली नाही. पहिल्या डावांत यष्टिरक्षक शेन डॉवरीच याने झुंजार खेळ केला. त्याने १०७ चेंडूंचा सामना करताना नाबाद ५७ धावा केल्या. डॉवरीचने फॉलोआॅन टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ते शक्य झाले नाही. भारताच्या शमी आणि यादव यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. अमित मिश्रानेदेखील दोन गडी बाद केले.
विंडीजच्या दुसऱ्या डावाची सुरुवातदेखील खराब राहिली. पहिल्या डावात एकही बळी न घेणाऱ्या ईशांत शर्मा याने पहिल्याच षटकात क्रेग ब्रेथवेटचा बळी घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडीजच्या १ बाद २१ धावा होत्या. चौथ्या दिवसाची सुरुवातही वेस्ट इंडीजसाठी खराब होती. पहिल्याच षटकात यादवने डॅरेन ब्रावोला १० धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर रविचंद्रन आश्विन नावाचे वादळ अॅँटिग्वाच्या खेळपट्टीवर पुन्हा घोंघावू लागले आणि त्याच्या फिरकीच्या जाळ््यात चंद्रिका, सॅम्युअल्स, चेस, ब्लॅकवूड आणि होल्डर हे एका पाठोपाठ एक अडकत गेले.
कसोटी सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त गडी बाद करण्याची आश्विनची ही १७ वी वेळ आहे. त्याने ३३ कसोटी सामन्यांत ही कामगिरी केली. सलामीवीर राजेंद्र चंद्रिका याने ३१ धावा केल्या, तर मार्लोन सॅम्युअल्स याने अर्धशतक झळकावले. ब्रेथवेटने तळाच्या फलंदाजाला सोबत घेऊन भारताचा विजय लांबणीवर टाकला त्याने नाबाद ५१ धावांची खेली केली. बिशूनेही ४५ धावांची खेळी करत भारताचा विजय लांबणीवर टाकला. पण अश्विनने भेदक मारा करत सामन्याच्या चौथ्याच दिवशी विजय मिळवून दिला.