भारताची विजयी आघाडी
By admin | Published: June 14, 2016 04:10 AM2016-06-14T04:10:50+5:302016-06-14T04:10:50+5:30
लेगस्पिनर युजवेंद्र चहलसह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने सोमवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे लढतीत झिम्बाब्वेचा ८ गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या
हरारे : लेगस्पिनर युजवेंद्र चहलसह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने सोमवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे लढतीत झिम्बाब्वेचा ८ गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
चहलच्या (३ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेचा डाव ३४.३ षटकांत १२६ धावांत गुंडाळला आणि प्रत्युत्तरात खेळताना विजयासाठी आवश्यक धावा २६.५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला कुठलीच अडचण भासली नाही. गेल्या लढतीत पदार्पणात शतकी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला (३३) चामू चिभाभाने माघारी परतवत झिम्बाब्वेला पहिले यश मिळवून दिले. विजयासाठी दोन धावांची गरज असताना करुण नायरला सिकंदर रजाने माघारी परतवले. त्याने ३९ धावांची खेळी केली. अंबाती रायडू ४१ धावा काढून नाबाद राहिला. त्याच्या खेळीत सात चौकारांचा समावेश आहे.
भारताने यापूर्वी २०१३ मध्ये झिम्बाब्वेचा ५-० ने, तर २०१५ मध्ये ३-० ने पराभव केला होता. दुसऱ्या लढतीत मिळवलेल्या विजयासह भारताने मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
त्याआधी, झिम्बाब्वेने अखेरच्या ७ विकेट केवळ २० धावांत गमावल्यामुळे त्यांचा डाव ३४.३ षटकांत संपुष्टात आला. भारतातर्फे बरिंदर सरन व धवल कुलकर्णी यांनी अनुक्रमे १७ व ३१ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी घेतले. चहलने २५ धावांत ३ फलंदाजांना माघारी परतवले.
हरारे स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सरन व कुलकर्णी यांचे चेंडू सुरुवातीपासून स्विंग होत होते. झिम्बाब्वेच्या डावाची सुरुवात हॅमिल्टन मसाकाजा (९) व चामू चिभाभा (२१) यांनी केली, पण त्यांना चांगली सुरुवात करून देता आली नाही. झिम्बाब्वेने ३९ धावांत ३ फलंदाजांना गमावले होते. अनुभवी वुसी सिबांडाने ६९ चेंडूंना सामोरे जाताना ५३ धावांची खेळी करीत डाव सावरला. सिबांडाने सिकंदर रजाच्या (१६ धावा, ४१ चेंडू) साथीने ६७ धावांची भागीदारी करीत संघाला शंभरचा पल्ला ओलांडून दिला. चहलने रजा व चिगुम्बुरा यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर चहलने सिंबाडालाही तंबूचा मार्ग दाखविला. सिबांडाने ६ चौकार व १ षट्काराच्या साह्याने अर्धशतकी खेळी केली. (वृत्तसंस्था)
धोनीने केली रणतुंगाची बरोबरी
भारतीय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय सामन्यात कर्णधारपद भूषवण्यामध्ये श्रीलंकेचा विश्वकप विजेता
कर्णधार अर्जुन रणतुंगाची बरोबरी केली. पुढच्या लढतीत तो रणतुंगाला पिछाडीवर सोडेल.
धोनीच्या नेतृत्वाखाली ही १९३ वी लढत होती. रणतुंगाने श्रीलंकेतर्फे १९३ वन-डे सामन्यांत कर्णधारपद भूषविले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने सोमवारी झिम्बाब्वेचा दुसऱ्या वन-डे लढतीत ८ गडी राखून पराभव केला. धोनीच्या नेतृत्वाखाली हा १०६ वा विजय आहे. विजय मिळवण्याच्या बाबतीत धोनी आॅस्ट्रेलियन कर्णधार अॅलन बॉर्डरपेक्षा एक विजय
पिछाडीवर आहे. बॉर्डरने १७८ सामन्यांत संघाचे नेतृत्व करताना १०७ सामने जिंकले होते.
वन-डेमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याच्या बाबतीत धोनी संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहे. त्याच्यापेक्षा न्यूझीलंडचा स्टिफन फ्लेमिंग (२१८) आणि आॅस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग (२३०) आघाडीवर आहे. झिम्बाब्वेविरुद्ध २-० ने विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने तिसऱ्या लढतीत सरशी साधली तर धोनी बॉर्डरची बरोबरी साधेल. सर्वाधिक सामन्यांत विजय मिळवण्यामध्ये पॉन्टिंग (१६५ सामने) आघाडीवर आहे.
गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय : धोनी
भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत व्हाईट वॉश देण्याच्या दिशेने वाटचाल केली असली तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मात्र आतापर्यंत अनेकांना फलंदाजीची संधी न मिळाल्यामुळे चिंता सतावत आहे.
धोनी म्हणाला, ‘आतापर्यंत
आमच्या आघाडीच्या केवळ तीन फलंदाजांना खेळण्याची संधी मिळाली. फलंदाजी क्रमामध्ये बदल करण्यास प्राधान्य राहील.’
अखेरची वन-डे लढत व तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत संघाच्या संयोजनाबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘पुढील सामन्यात संघातील बदलाबाबत संजय बांगर यांच्यासोबत चर्चा करणार आहे. एका लढतीत सर्वच खेळाडू खेळवणे शक्य नसते. टी-२० मालिकेत कुणाला संधी द्यायची याबाबत चर्चा करणार असून, काही गोलंदाजांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात येईल.’
धोनीने विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले आहे. धोनी म्हणाला, ‘आमच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेचा डाव माफक धावसंख्येत रोखण्याची कामगिरी केली. झिम्बाब्वे दोनशे धावांचा पल्ला गाठण्याची अपेक्षा होती, पण आमच्या फिरकीपटूंनी महत्त्वाचे बळी घेत त्यांना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
‘पुन्हा एकदा नाणेफेक गमावल्याचा फटका बसला, पण आमच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. दोनशेपेक्षा अधिक धावांची मजल मारत प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यासाठी प्रयत्नशील होतो. खेळाडू दुखापतग्रस्त होणे निराशाजनक असते, पण तरी आमच्याकडे आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याची क्षमता असलेले फलंदाज होते. आम्हाला अद्याप चार सामने खेळायचे असून टी-२० मालिकेत प्रतिस्पर्धी संघापुढे आव्हान निर्माण करण्यात यश येईल. - ए. क्रेमर, कर्णधार, झिम्बाब्वे
सुरुवातीला माझ्या गोलंदाजीवर खूप धावा गेल्या. परंतु, धोनीने मला चेंडू हवेत संथ गतीने टाकण्यास सांगितले. धोनीची ही युक्ती सफल ठरली.
- युजवेंद्र चहल, सामनावीर
धावफलक
झिम्बाब्वे : एच. मसाकाजा झे. बुमरा गो. सरन ०९, चामू चिभाभा पायचित गो. कुलकर्णी २१, पी. मूर पायचित गो. सरन ०१, वुसी सिबांडा झे. जाधव गो. चहल ५३, सिकंदर रजा झे. जाधव गो. चहल १६, एल्टन चिगुम्बुरा त्रि. गो. चहल ००, आर. मुतुम्बाजी झे. धोनी गो. बुमराह ०२, ए. क्रेमर नाबाद ०७, टी. चतारा त्रि. गो. कुलकर्णी ०२, टी. मुजाराबानी पायचित गो. पटेल ०५, एस. विलियम्स अबसेंट हर्ट. अवांतर (१०). एकूण ३४.३ षटकांत सर्वबाद १२६. बाद क्रम : १-१९, २-२१, ३-३९, ४-१०६, ५-१०६, ६-१०७, ७-११२, ८-११५, ९-१२६. गोलंदाजी : सरन ६-१-१७-२, कुलकर्णी ९-१-३१-२, बुमराह ६-०-२७-१, पटेल ७.३-०-२२-१, चहल ६-२-२५-३.
भारत : लोकेश राहुल त्रि. गो. चिभाभा ३३, करुण नायर पायचित गो. रजा ३९, अंबाती रायडू नाबाद ४१, मनीष पांडे नाबाद ०४. अवांतर (१२). एकूण २६.५ षटकांत २ बाद १२९. बाद क्रम : १-५८, २-१२५. गोलंदाजी : चतारा ८-१-४०-०, मुजुरबानी ३-१-१३-०, चिभाभा ९-१-३१-१, क्रेमर ३-०-१७-०, चिगुम्बुरा २-०-२०-०, रजा १.५-०-७-१.