भारताची विजयी सलामी

By Admin | Published: April 7, 2016 02:11 AM2016-04-07T02:11:30+5:302016-04-07T02:11:30+5:30

२५ व्या सुलतान अझलान शाह ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताने बुधवारी जपानला २-१ असे पराभूत केले. कर्णधार सिंगने निर्णायक वेळी गोल करीत पिछाडीवर पडलेल्या भारताला विजय मिळवून दिला

India's winning salute | भारताची विजयी सलामी

भारताची विजयी सलामी

googlenewsNext

इपोह (मलेशिया) : येथे सुरू झालेल्या २५ व्या सुलतान अझलान शाह ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताने बुधवारी जपानला २-१ असे पराभूत केले. कर्णधार सरदार सिंगने निर्णायक वेळी गोल करीत पिछाडीवर पडलेल्या भारताला विजय मिळवून दिला. जपानच्या अनुभवी संघाने भारताला विजयासाठी झुंझवले. या सामन्याद्वारे जपानच्या नऊ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले.
या सामन्यात भारताला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या; मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. जपानविरुद्ध भारताला मोठा विजय संपादन करता आला असता; मात्र भारतीय खेळाडूंची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नाही. आपल्यापेक्षा कमकुवत असलेल्या संघाविरुद्ध मोठा विजय मिळवण्याची संधी भारताने
घालवली. भारताचा तरुण खेळाडू हरमनप्रीत सिंग व कर्णधार
सरदार सिंग यांनी गोल केले; तर जपानकडून एकमेव गोल केंजी किताजातो याने केला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीयांनी आक्रमणाचे धोरण अवलंबले होते. मात्र, जपानच्या बचावपटूंनी भारताच्या आघाडीच्या खेळाडूंना गोल करण्याची संधी दिली नाही. सामन्याच्या १३ व्या मिनिटाला रमनदीपने दिलेल्या पासवर सुनीलने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या बारला लागून बाहेर गेला. त्यानंतर जपानने आक्रमण करीत १७ व्या मिनिटाला गोल करीत भारतीय गोटातील चिंता वाढवली. जपानला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर केंजी याने गोलमध्ये करीत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र भारताने सावध खेळास प्रारंभ केला. २४ व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात मनदीपला यश आले नाही. मात्र, लगेचच पुढच्या मिनिटात भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगने जपानच्या गोलकिपरला चकवत गोल केला व भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. या गोलनंतर भारताने आपल्या आक्रमणाची धार वाढवली.
कर्णधार सरदार सिंगने रचलेल्या चालीमुळे जपानच्या बचावपटूंवर दबाव आला. सामन्याच्या ३२ व्या मिनिटाला सरदार सिंगने आपल्या रिव्हर्स फ्लिकची करामत दाखवत जपानच्या गोलकिपरला चकवले. जसजित सिंगच्या पासवर सरदारने केलेल्या गोलमुळे भारताला २-१
अशी आघाडी मिळाली.
सामना संपेपर्यंत ही आघाडी कायम राहिली. (वृत्तसंस्था)

Web Title: India's winning salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.