भारताचा यूएईवर दणदणीत विजय

By Admin | Published: March 3, 2016 06:55 PM2016-03-03T18:55:19+5:302016-03-03T21:45:14+5:30

भारताने नऊ गडी आणि ५९ चेंडू राखून संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजयाची नोंद केली. यूएईचे ८२ धावांचे माफक लक्ष्य भारताने आरामात पार केले.

India's winning sound on UAE | भारताचा यूएईवर दणदणीत विजय

भारताचा यूएईवर दणदणीत विजय

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मिरपूर, दि. ३ - सलामीवर रोहित शर्माची २८ चेंडूतील ३९ धावांची खेळी आणि त्यानंतर युवराज सिंगने केलेली फटकेबाजी याच्या जोरावर भारताने नऊ गडी आणि ५९ चेंडू राखून संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजयाची नोंद केली. यूएईचे ८२ धावांचे माफक लक्ष्य भारताने आरामात पार केले.
भारताने आशिया कप टी-२० स्पर्धेची आधीच अंतिम फेरी गाठल्याने आजचा सामना फक्त औपचारीकता होता. मात्र या सामन्यातही भारताने प्रतिस्पर्ध्यांना कुठलीही दयामाया दाखवली नाही. भारताने स्पर्धेत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. अंतिम फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी आहे. 
संयुक्त अरब अमिरातीच्या ८२ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली मात्र रोहित शर्माच्या रुपाने भारताला ४३ धावांवर पहिला धक्का बसला. 
रोहित ३९ धावांवर बाद झाला. कादीर अहमदने मोहम्मद नावीदकरवी त्याला झेलबाद केले. आता डावखुरा युवराज सिंग आणि सलामीवर शिखर धवनची जोडी मैदानावर असून, भारताची वेगाने लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. भारताच्या आठ षटकात ६२ धावा झाल्या असून, विजयासाठी फक्त २० धावांची आवश्यकता आहे. प्रथम फलंदाजी करणा-या संयुक्त अरब अमिरातीने निर्धारीत वीस षटकात ९ बाद ८१ धावा करुन भारताला विजयासाठी माफक ८२ धावांचे लक्ष्य दिले आहे. शाईमन अन्वरचा ४३ धावांचा अपवाद वगळता यूएईचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर तग धरु शकला नाही. 
यूएईकडून सलामीवीर रोहन मुस्तफा आणि शाईमन अन्वरमध्ये तिस-या विकेटसाठी झालेली २३ धावांची भागीदारी सर्वाधिक ठरली. अन्वर खालोखाल मुस्तफाने सर्वाधिक ११ धावा केल्या. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर यूएईचा संघ ढेपाळला. 
यूएईच्या सात षटकात दोन बाद २५ धावा झाल्या होत्या. अवघ्या एका धावेवर सलामीवीर एसपी पाटील बाद झाला. त्याला भुवनेश्वर कुमारने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.
पाठोपाठ मोहम्मद शहजाद भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्याला बुमराहने रैनाकरवी झेलबाद केले. रोहन मुस्तफा ११ आणि शाईमन अन्वर ७ धावांवर खेळत आहेत. 
भारत आणि दुबळया संयुक्त अरब अमिरातीमध्ये आशिया कप टी-२० स्पर्धेतील आजचा शेवटचा साखळी सामना होत आहे. यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने आधीच अंतिम फेरी गाठली आहे आणि यूएईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 
त्यामुळे हा सामना फक्त औपचारीकता आहे. बांगलादेश विरुद्ध अंतिम फेरीचा सामना खेळण्याआधी या सामन्यात भारताने संघात काही बदल केले आहेत. 
मागच्या काही सामन्यांपासून राखीव खेळाडूंमध्ये बसलेल्या पवन नेगी, हरभजन सिंग आणि भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश केला आहे. या सामन्याव्दारे पवन नेगी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदापर्ण करत आहे. 
 
युएईविरुद्धचा भारतीय संघ - शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पंड्या, पवन नेगी, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.

Web Title: India's winning sound on UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.