वय काय, विचारणं सोडा, आता फक्त जय बोला; 'टीनएजर' ब्रिगेडचे यश थक्क करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:44 PM2018-08-30T12:44:19+5:302018-08-30T12:44:48+5:30

आपल्यापैकी बरेच जण सहज बोलून जातात की, 15 आणि 16 वर्ष हे काय वय आहे का हो काही करुन दाखवण्याचे? हे वय आहे धम्माल मस्ती करत लाईफ एन्जॉय करण्याचे पण , या मताचे तुम्ही असाल तर हे वाक्य पुन्हा बोलताना दहा वेळा विचार करा. कारण, याच वयातील मुलंमुली यंदा मानाच्या बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला धडाक्याने पदकं जिंकून देत आहेत.

india's young players shine in asian games 2018 | वय काय, विचारणं सोडा, आता फक्त जय बोला; 'टीनएजर' ब्रिगेडचे यश थक्क करणारे

वय काय, विचारणं सोडा, आता फक्त जय बोला; 'टीनएजर' ब्रिगेडचे यश थक्क करणारे

googlenewsNext

- ललित झांबरे
आपल्यापैकी बरेच जण सहज बोलून जातात की, 15 आणि 16 वर्ष हे काय वय आहे का हो काही करुन दाखवण्याचे? हे वय आहे धम्माल मस्ती करत लाईफ एन्जॉय करण्याचे पण , या मताचे तुम्ही असाल तर हे वाक्य पुन्हा बोलताना दहा वेळा विचार करा. कारण, याच वयातील मुलंमुली यंदा मानाच्या बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला धडाक्याने पदकं जिंकून देत आहेत. गोल्ड कोस्टचे राष्ट्रकुल सामने असतील की सध्या सुरु असलेल्या जाकार्ता-पलेंबांग आशियाई क्रीडा स्पर्धा असतील, त्यात या यंग ब्रिगेड, माफ करा.. 'टिनएजर ब्रिगेड'चे यश अक्षरशः थक्क करून सोडणारे आहे. 

अवघ्या 15 वर्षांचा अनिश भानवाला हा  सुवर्ण आणि शार्दुल विहान हा रौप्यपदक जिंकतो काय, त्याच्यापेक्षा किंचित मोठे पण फक्त 16 वर्षांचेच सौरभ चौधरी व मनू भाकर हे थेट सुवर्णपदकावर आपले नाव कोरतात. हर्षाली तोमर कांस्यपदक निश्चित करते काय, 17 वर्षांची मेहुली घोषचा भारताची रौप्यपदक विजेती असा उल्लेख होतो काय, सारेच अविश्वसनीय! सारेच थक्क करणारे! आणि अर्थातच अभिमानास्पद, यशदायी भविष्याची गॅरंटी देणारे! 

हे आठवण्याचे कारण हे की सध्या सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये शार्दूल विहान व सौरभ चौधरी यांनी वय सोळाच्या आतच. यशाचा डंका वाजविल्यावर आता मध्यप्रदेशच्या हर्षिता तोमरने त्यांच्या पंक्तीत आपले स्थान निश्चित केले आहे. मध्यप्रदेशातील होशंगाबादच्या या अवघ्या 16 वर्षांच्या या मुलीने सेलींग (शिडाचे नौकानयन) मध्ये शेवटची फेरी बाकी असतानाच आपले आशियाड कास्यपदक निश्चित केले आहे. तिच्या लेसर 4.7 गटाची 12 वी आणि शेवटची फेरी शुक्रवारी पार पडल्यावर तिच्या पदकावर शिक्कामोर्तब होईल. मात्र, 11 व्या फेरीअखेरच तिने एवढी चांगली कामगिरी करुन ठेवलीय की शुक्रवारी 12 व्या स्पर्धेत ती उतरली नाही तरी तिचे कांस्यपदक निश्चित आहे. आणि उतरली तर चीनच्या जियान शिंग वांग हिला मागे टाकत हर्षिताला रौप्यपदकाची संधी आहे. तीसुध्दा अवघ्या 16 वर्षे वयात! 

याच वयाच्या सौरभ चौधरीने गेल्याच आठवड्यात भारताला नेमबाजीच्या 10 मीटर एअर पिस्तुलचे सुवर्णपदक जिंकून दिले. पण पदकाच्या नाही पण वयाच्या बाबत पुढच्या 24 तासातच शार्दूल विहानने त्याला मागे टाकले. वय फक्त 15 वर्षे आणि शार्दूलने नेमबाजीच्या डबल ट्रॅपचे सुवर्ण पदक आपल्या नावे केले. 

आशियाडमधील सर्वात कमी वयाचा पदक विजेता म्हणून शार्दूलची नोंद झाली. शार्दुलच्या आधी यंदाच अशी नोंद नेमबाज अनिश भानवालाच्या नावाचीही झाली. यंदा एप्रिलमध्ये तो राष्ट्रकुल सामन्यांतील भारताचा सर्वात कमी वयाचा सुवर्ण पदक विजेता ठरला. अवघ्या 15 वर्षे वयात गोल्ड कोस्ट इथल्या राष्ट्रकुल सामन्यांमध्ये त्याने 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुलचे सुवर्ण पदक जिंकले. निव्वळ सुवर्णपदकाचा निकष लावला तर आजही अनिश भानवाला हा भारताचा सर्वात तरूण विजेता ठरतो. दुर्दैवाने आशियाडमध्ये मात्र त्याच्या पदरी निराशा पडली. 

अनिश हा बहुराष्ट्रीय स्पर्धांत भारताचा सर्वात कमी वयाचा सुवर्णपदक विजेता आहे का, याबद्दल मात्र एकमत नाही कारण आहे 1970 च्या एडिनबर्ग राष्ट्रकुल सामन्यांतील मल्ल वेदप्रकाशची कामगिरी.  त्यावेळी वेदप्रकाशने कुस्तीच्या लाईट फ्लायवेट गटाचे सुवर्ण पदक जिंकले होते आणि असे म्हणतात की वेदप्रकाशचे त्यावेळी वय होते अवघे 14 वर्ष. फक्त 14 वर्ष वयात राष्ट्रकूल सुवर्णपदक. पासपोर्ट आणि कुस्ती महासंघाकडच्या नोंदणीआधारे वेदप्रकाशचे हे वय मानण्यात आले असले तरी त्याची अधिकृत पुष्टी मात्र झालेली नाही म्हणून वेदप्रकाशच्या या विक्रमाबद्दल संभ्रम आहे परंतु, काहींच्या मते तर तो त्यावेळी 14 नव्हे बाराच वर्षांचा होता. 

आपली आणखी एक नेमबाज मनू भाकर हिनेसुध्दा अवघ्या 16 वर्षे वयातच यंदा यशाचा झेंडे गाडले. जाकार्ता-पलेंबांग आशियाडमध्ये भलेही तिला पदक मिळाले नसेल पण झझ्झर गावच्या या मुलीने यंदाच एप्रिलमध्ये गोल्डकोस्ट राष्ट्रकुल सामन्यांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. सध्याच्या आशियाडमध्येही 25 मीटर एअर पिस्तुलमध्ये ती सहावी आणि 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये पाचवी आली असली तरी या दोन्ही प्रकारात तिने नव्या स्पर्धा विक्रमांची नोंद करुन मने जिंकली आहेत. 

मनूसोबतच गोल्डकोस्ट राष्ट्रकूल सामने गाजविणारी मेहुली घोष हीसुध्दा फक्त 17 वर्षांची. मात्र तिने नवा राष्ट्रकुल विक्रम नोंदवत 10 मीटर एअर रायफलचे रौप्यपदक आपल्या नावे केले होते. थोडक्यात म्हणजे कायद्यानुसार सज्ञान होण्याआधीच या 'टीनएजर ब्रिगेड'ने भारताचा मानसन्मान मात्र कितीतरी वाढवलाय. म्हणून म्हणतो 15- 16 हे काय काही करुन दाखवण्याचे वय आहे का असे म्हणताना आता दहादा विचार करा.

Web Title: india's young players shine in asian games 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.