भारत-इंग्लंड लढत अनिर्णीत
By admin | Published: November 14, 2016 01:55 AM2016-11-14T01:55:51+5:302016-11-14T01:55:51+5:30
कर्णधार विराट कोहलीच्या लढवय्या खेळीमुळे भारताला प्रतिकूल परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध रविवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आले.
राजकोट : कर्णधार विराट कोहलीच्या लढवय्या खेळीमुळे भारताला प्रतिकूल परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध रविवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आले. इंग्लंडच्या पहिल्या डावात ११७ धावांची खेळी करणारा आणि लढतीत एकूण ३ बळी घेणारा अष्टपैलू मोईन अली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उभय संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना १७ नोव्हेंबरपासून विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे.
कर्णधार कुकच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी ३१० धावांचे आव्हान ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना लेग स्पिनर आदिल राशिद (३-६४), डावखुरा फिरकीपटू जफर अन्सारी (१-४१) व मोईन अली (१-४७) यांच्या अचूक माऱ्यापुढे भारताची एक वेळ ४ बाद ७१ अशी अवस्था झाली होती, पण कर्णधार कोहली (नाबाद ४९), रविचंद्रन आश्विन (३२), रवींद्र जडेजा (नाबाद ३२) व मुरली विजय (३१) यांच्या खेळीच्या जोरावर यजमान संघाने ६ बाद १७२ धावांची मजल मारत सामना अनिर्णीत राखला.
त्याआधी, कर्णधार अॅलिस्टर कुकने (१३०) शानदार फलंदाजी करताना कारकिर्दीतील ३० वे शतक झळकावले. इंग्लंडने दुसरा डाव ३ बाद २६० धावसंख्येवर घोषित करीत भारतापुढे ४९ षटकांत ३१० धावा फटकावण्याचे लक्ष्य ठेवले.
चार वर्षांपूर्वी भारत दौऱ्यावर चमकदार कामगिरी करणाऱ्या कुकने कामगिरीत सातत्य राखताना भारताविरुद्ध सहावे, तर भारतात पाचवे शतक ठोकले. विदेशी फलंदाजातर्फे भारतात झळकावलेली ही सर्वाधिक शतके आहेत. कुकने विंडीजचे एवर्टन विक्स व क्लाईव्ह लॉईड आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला यांना पिछाडीवर सोडले. यांच्या नावावर भारतात प्रत्येकी चार शतकांची नोंद आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात ख्रिस व्होक्सने गौतम गंभीरला माघारी परतवले. त्या वेळी संघाचे खातेही उघडले नव्हते. पुजारा (१८) चहापानापूर्वी रशिदचे लक्ष्य ठरला. पुजारा व विजय यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. विजयला वैयक्तिक १३ धावांवर असताना अन्सारीने स्वत:च्या गोलंदाजीवर जीवदान दिले, पण त्याला त्याचा लाभ घेता आला नाही. चहापानानंतर रशिदच्या गोलंदाजीवर तो हमीदकडे झेल देत माघारी परतला. अजिंक्य रहाणे (१) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. मोईन अलीने त्याला तंबूचा मार्ग दाखविला. त्या वेळी भारताची ४ बाद ७१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कोहली व आश्विन यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. कोहली व आश्विन यांनी १५ पेक्षा अधिक षटके इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. दरम्यान, आश्विनने अन्सारीच्या गोलंदाजीवर तीन चौकार ठोकले आणि याच षटकात कव्हरमध्ये जो रुटकडे झेल देत माघारी परतला. त्याने ५३ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकाराच्या मदतीने ३२ धावा केल्या. रिद्धिमान साहाला (९) खेळपट्टीवर अधिक वेळ तग धरता आला नाही. त्यानंतर कोहलीने जडेजाच्या साथीने डाव सावरला. त्यानी सातव्या विकेटसाठी १० षटकांत ४० धावांची अभेद्य भागीदारी करीत इंग्लंडच्या विजय मिळवण्याच्या आशा धुळीस मिळवल्या.
कोहलीने ९८ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार ठोकले, तर जडेजाच्या ३३ चेंडूंच्या खेळीमध्येही सहा चौकारांचा समावेश आहे.
त्याआधी, सकाळच्या सत्रात लेग स्पिनर अमित मिश्राने ११ चेंडूंच्या अंतरात २ बळी घेतले, पण कुकच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने आपली स्थिती मजबूत केली. पहिल्या
डावात केवळ १ बळी घेणाऱ्या
मिश्राने आज आपल्या पहिल्या दोन षटकांत सलामीवीर हसीब हमीद (८२) व जो रुट (४) यांना तंबूचा मार्ग दाखवला. (वृत्तसंस्था)