भारत-पाक महामुकाबला आज

By admin | Published: June 4, 2017 06:12 AM2017-06-04T06:12:39+5:302017-06-04T06:12:39+5:30

गतविजेता भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या सलामीला आज, रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

Indo-Pak Mahamababala today | भारत-पाक महामुकाबला आज

भारत-पाक महामुकाबला आज

Next

बर्मिंगहॅम : गतविजेता भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या सलामीला आज, रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेच्या प्रारंभी संघातील वाद चव्हाट्यावर आल्याने वादाला मूठमाती देत रोमांच आणि तणाव झुगारून पाकवर विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान टीम इंडियापुढे असेल. हा सामना दुपारी तीन वाजल्यापासून रंगणार आहे.
हा सामना म्हणजे पाकचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्यातील ‘जंग’ मानली जात आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पाकचे गोलंदाज विरुद्ध भारतीय फलंदाज अशीच ही लढत आहे. कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, युवराजसिंग आणि महेंद्रसिंग धोनी या फलंदाजांपुढे पाकचे आमिर आणि जुनैद खान यांच्यासारखे गोलंदाज आहेत. 
भारतासाठी गोलंदाजी संतुलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे सर्वच गोलंदाज सर्वोत्कृष्ट फलंदाजीला खिंडार पाहू शकतात. भारत-पाक सामना असेल तर तो इतर सामन्यांच्या तुलनेत वेगळा मानला जातो. सामन्याचा प्रभाव राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावरदेखील दिसून येतो. क्रिकेटपटू सामना खेळत असले तरी दोन्ही देशांतील चाहत्यांना पराभव कधीही पचनी पडत नाही. 
पाकला कसे हरवायचे हे विराटला चांगले ठाऊक आहे. पण, त्याच्या परिपक्वपणाची ही कसोटी असेल. कोच कुंबळेसोबतच्या मतभेदाचे वृत्त ऐन सामन्याच्या पूर्वसंध्येला बाहेर आले. अशावेळी मैदानाबाहेरील वाद विसरुन स्पर्धा जिंकण्याचे संघापुढे आव्हान असेल. 
दुसरीकडे पाक संघदेखील वादविवादाला अपवाद नाही. स्पर्धेआधीच उमर अकमल याला खराब फिटनेसमुळे मायदेशी परत पाठविण्यात आले. चॅम्पियन्समध्ये भारताविरुद्ध पाकचे रेकॉर्ड २-१ असा आहे. उद्याच्या लढतीत मात्र टीम इंडियाचे पारडे प्रत्येक बाबतीत जड वाटते. फलंदाजीत रोहित सहा महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून, शिखर धवन २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहे. आजारी युवराजचे खेळणे निश्चित नाही. दिनेश कार्तिक त्याचे स्थान घेऊ शकतो. (वृत्तसंस्था)

पाऊस खलनायक ठरण्याची शक्यता
भारत-पाक सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने ही माहिती देताच दोन्ही देशांतील कोट्यवधी चाहते चिंताग्रस्त झाले. आज, रविवारी सामन्याच्या सकाळच्या सत्रात आणि दुपारी पाऊस कोसळू शकतो. हवामान खात्याच्या अन्य वेबसाईटस्नुसार मात्र पावसाची शक्यता ७० टक्के इतकी आहे. तथापि, इंग्लंडमध्ये सध्याच्या वातावरणात पाऊस कधी धो-धो कोसळतो, तर कधी ढगाळ हवामानामुळे हवेत गारवा असतो. अनेकदा १० मिनिटे पाऊस आल्यानंतर दिवसभर कधीही त्रास होत नाही. शुक्रवारी अधूनमधून झालेल्या पावसामुळे आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड लढतीवर पाणी फेरले गेले. अखेर उभय संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले होते.

उभय संघ यातून निवडणार
भारत
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र्र जडेजा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रवीचंद्रन अश्विन.

पाकिस्तान
पाकिस्तान : सरफराज अहमद (कर्णधार) अहमद शहजाद, अजहर अली, बाबर आझम, फहीम अशरफ, फखार जमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वसीम, जुनैद खान, मोहम्मद आमिर, मोहम्मद हफीज, शादाब खान, शोएब मलिक, वहाब रियाज.

Web Title: Indo-Pak Mahamababala today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.