भारत-पाक सामना २-२ ने ड्रॉ
By admin | Published: June 27, 2015 12:58 AM2015-06-27T00:58:37+5:302015-06-27T00:58:37+5:30
रमणदीपसिंग याने नोंदविलेल्या दोन गोलमुळे फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्यफेरीतील स्पर्धेत शुक्रवारी
एंटवर्प : रमणदीपसिंग याने नोंदविलेल्या दोन गोलमुळे फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्यफेरीतील स्पर्धेत शुक्रवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-२ असे बरोबरीत रोखले. भारताला आज विजयाची हॅट्ट्रिक साधण्याची संधी होती; पण विजयाची कोंडी न फुटल्यामुळे ड्रॉ वर समाधान मानावे लागले.
रमणदीपने वारंवार हल्ले करीत आक्रमक खेळाच्या बळावर १३व्या तसेच ३९व्या मिनिटाला दोन गोल केले. पाककडूनदेखील दोन्ही गोल इम्रानने २३व्या तसेच ३७व्या मिनिटाला नोंदविले. भारताने दुसऱ्या क्वार्टरमधील शिथिलतेचा अपवद वगळता अन्य तिन्ही क्वार्टरमध्ये सुरेख खेळ केला. पण अखेरच्या क्षणी केलेल्या चुका भोवल्यामुळे संघाला केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. रियो आॅलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरलेल्या भारताने ‘अ’ गटात मात्र अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताचे तीन सामन्यांतून सात गुण झाले आहेत तर पाकचे तीन सामन्यानंतर चार गुण असल्याने हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पुढील सामना २८ जून रोजी विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध होईल.
आजच्या लढतीत भारतीय संघाने सुरुवातीपासूनच चढाईचे धोरण अवलंबून संतुलित खेळ केला. दोन्ही संघांनी एकमेकांवर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करून पाहिला. दरम्यान युवराज वाल्मीकी जखमी झाला. याच वेळेत पाकच्या खेळाडूंनी प्रतिहल्ले सुरू केले. तथापि, भारताच्या बचाव फळीने त्यांचा प्रत्येक हल्ला उत्कृष्ट संतुलनाद्वारे थोपवून धरला. रमणदीपच्या शानदार प्रयत्नांच्या बळावर भारताला १३व्या मिनिटाला खाते उघडण्यात यश आले. गुरमेलने डाव्या फळीमधून जलद पास देताच रमणदीपने शिताफीने स्टिक लावून चेंडू गोलजाळीत ढकलला.
पाकला दुसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर भारताने चांगला बचाव केला; पण रेफ्रीने पाकिस्तानला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. भारतीय संघाने यावर विरोध दर्शविताना रेफरलची मागणी केली; पण त्याचाही निर्णय पाकच्या बाजूने गेला. इम्रानने पेनल्टी स्ट्रोकवर श्रीजेशच्या डाव्या बगलेतून गोल नोंदवून पाकला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
त्यानंतर भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाले; पण सतबीरसिंग व रमणदीप यांना गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. मध्यंतराला उभय संघांदरम्यान १-१ बरोबरी होती. तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागले. सतबीरला यलो कार्ड दाखविण्यात आले होते. पाकने त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला; पण भारतीय बचाव फळीने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पाकला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर इम्रानने गोल नोंदवून पाकला २-१ अशी आघाडी मिळवून दिली; पण भारताने त्यांना हा आनंद फार वेळ उपभोगू दिला नाही. दविंदर वाल्मीकीच्या चमकदार पासवर रमणदीपने मैदानी गोल नोंदवून दोन मिनिटांच्या अंतरात भारताला बरोबरी साधून दिली.
त्यानतंर वाल्मीकीला यलो कार्ड दाखविण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागले. भारतीय संघाने आक्रमक खेळ कायम ठेवत पाकच्या बचाव फळीला व्यस्त ठेवले. भारताला पेनल्टी कॉर्नरही मिळाला होता; पण त्यावर गोल नोंदविता आला नाही. दरम्यान, भारताला दोनदा आघाडी घेण्याची संधी होती; पण पाकच्या गोलकीपरने उत्कृष्ट बचाव करून भारताचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. युवराज वाल्मीकीला ५३व्या मिनिटाला गोल नोंदवण्याची नामी संधी होती; पण त्यात तो अपयशी ठरला. (वृत्तसंस्था)