फायनलसारखी असेल भारत-पाक लढत : इंझमाम
By admin | Published: February 3, 2015 01:22 AM2015-02-03T01:22:35+5:302015-02-03T01:22:35+5:30
भारताला विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्याची ६० ते ७० टक्के संधी असून भारत व पाकिस्तान यांच्यादरम्यानची लढत फायनलसारखी असेल,
नवी दिल्ली : भारताला विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्याची ६० ते ७० टक्के संधी असून भारत व पाकिस्तान यांच्यादरम्यानची लढत फायनलसारखी असेल, असे मत पाकिस्तानच्या विश्वकप विजेता संघाचा सदस्य व माजी कर्णधार इंझमाम उल-हक याने व्यक्त केले. एका वृत्तवाहिनीतर्फे विश्वकप क्रिकेटवर सोमवारी आयोजित चर्चासत्रात इंझमाम, भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्षेत्ररक्षक व भारताचा माजी सलामीवीर अरुण लाल यांनी आपले विचार मांडले.
इंझमामच्या मते भारताला जेतेपद राखण्याची ६० ते ७० टक्के संधी आहे तर अरुणलाल व शोएब यांच्या मते भारत अव्वल चार संघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरेल. कपिल देव यांनी सहयजमान न्यूझीलंड छुपारुस्तम असल्याचे सांगताना पहिली १५ षटके भारतासाठी निर्णायक ठरतील, असे मत व्यक्त केले. इंझमाम पुढे म्हणाला,‘आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी भारतीय संघ येथे बरेच दिवसांपासून आहे. त्यांना येथील वातावरणाचा सराव झाला असून त्याचा त्यांना लाभ मिळेल. पराभूत संघामध्ये पुनरागमन करण्यासाठी नवा उत्साह संचारतो, असा अनुभव आहे. भारतीय फलंदाजांमध्ये संघाला पुन्हा एकदा विश्वविजेतेपद पटकावून देण्याची क्षमता आहे. भारताकडे रोहित, विराट व रैना यांच्यासारखे सामना जिंकून देणारे फलंदाज आहे. (वृत्तसंस्था)
धोनीचे नेतृत्व भारताच्या यशाची किल्ली : इंझमाम व शोएब
विश्वकप क्रिकेट स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीसारखा कर्णधार भारतीय संघाच्या यशाची कुंजी ठरेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल-हक व शोएब अख्तर यांनी व्यक्त केले. पाच विश्वकप स्पर्धेत पाक संघाचे प्रतिनिधित्व करणारा इंजमाम म्हणााल,‘धोनीकडे संघाचे नेतृत्व असणे महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अनुभवी कर्णधार असणे आवश्यक ठरते. धोनीने दडपणाच्या स्थितीत भारतातर्फे चांगली कामगिरी केली आहे. दडपणाखाली चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेला कर्णधार भारतीय संघाकडे आहे. शोएब म्हणाला,‘संघ दडपणाखाली असताना धोनी पुढे सरसावत संघाचे नेतृत्व करतो. त्याच्यावर कसेलच दडपण जाणवत नाही.’