भारत-पाक मालिका सरकारच्या निर्णयावर अवलंबून

By admin | Published: December 8, 2015 11:48 PM2015-12-08T23:48:47+5:302015-12-08T23:48:47+5:30

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका खेळविण्यात आलेल्या खेळपट्टीवर चौफेर टीका होत आहे; परंतु भारताचा माजी शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने मात्र

Indo-Pak series depends on the government's decision | भारत-पाक मालिका सरकारच्या निर्णयावर अवलंबून

भारत-पाक मालिका सरकारच्या निर्णयावर अवलंबून

Next

औरंगाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका खेळविण्यात आलेल्या खेळपट्टीवर चौफेर टीका होत आहे; परंतु भारताचा माजी शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने मात्र, ‘ही चर्चा निरर्थक आहे. खेळपट्टी खेळण्यायोग्य होती,’ असे मत व्यक्त केले.
व्हेरॉक समूहातर्फे आयोजित आंतरशालेय व औद्योगिक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी लक्ष्मण मंगळवारी औरंगाबादेत आला होता. आपल्या शैलीदार कलात्मक फलंदाजीने २००१मध्ये कोलकता येथे प्रतिकूल परिस्थितीत २८१ धावांची मॅरेथॉन खेळी करून स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताला संस्मरणीय विजय मिळवून देणाऱ्या लक्ष्मणने दक्षिण आफ्रिका-भारत, वर्ल्डकप आणि अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्याविषयी आपली मते मनमोकळेपणाने मांडली.
दक्षिण आफ्रिकेसारख्या नंबर वन देशाला धूळ चारणाऱ्या भारताच्या दिल्लीतील कसोटी विजयाबद्दल छेडले असता, लक्ष्मण म्हणतो... या कसोटीचे श्रेय आपण दक्षिण आफ्रिका आणि भारतीय गोलंदाजांना देऊ. दक्षिण आफ्रिकेने दिल्ली कसोटीआधी पूर्ण मालिकेतच फायटिंग स्पिरीट दाखविले नाही; परंतु त्यांनी दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दाखविलेली झुंजार वृत्ती प्रशंसनीय आहे. अ‍ॅबी डिव्हिलियर्ससारख्या स्फोटक फलंदाजानेही तब्बल ३५४ चेंडू खेळताना किल्ला लढवताना ४३ धावा केल्या.
दुसरे श्रेय भारतीय गोलंदाजांना आहे. कर्णधार विराट कोहलीने चांगली कॅप्टनशिप केली. आफ्रिकेचे फलंदाज भागीदारी करीत असतानाही त्याने हार मानली नाही आणि गोलंदाजांनीही त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पेलली. तथापि, लक्ष्मणने दक्षिण आफ्रिकेच्या गेमप्लॅनविषयी नाराजीही व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जरी यश मिळविले, तरी भारतीय संघ परदेशातील उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर यशस्वी ठरेल का, असे छेडले असता लक्ष्मण म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका येथील खेळपट्ट्यांवर अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि मुरली विजय यांनी स्कोअर केला आहे. तथापि, तेथील खेळपट्ट्यांवरील यश चिंतेची बाब आहे. त्यासाठी महत्त्वपूर्ण खेळी करणे योग्य असते. अशा प्रकारची खेळी अजिंक्य रहाणे याने दिल्ली कसोटीत करून दाखविली. त्याने प्रतिकिूल स्थितीतही परिस्थितीशी जुळवून घेताना दोन्ही डावांत बहारदार खेळी करून परिपक्वता दाखविली. या मालिकेमुळे भारताला मॅचविनिंग गोलंदाज आणि फलंदाज मिळाले; त्यामुळे भारत रँकिंगमध्ये कसोटीत नक्कीच नंबर वन बनेल.’’
दक्षिण आफ्रिका व भारत यांच्यातील मालिकेत खेळपट्टीवर टीका होत आहे. याविषयी लक्ष्मणने सांगितले, ‘‘या मालिकेत सामने खेळवण्यात येणाऱ्या खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजांसाठी पोषक होत्या. नागपूर येथील खेळपट्टीही खेळण्यालायक नव्हती, असे म्हणता येणार नाही. येथील खेळपट्टीवर माती थोडी सैल होती आणि ती आवश्यक अशी रोल केलेली नव्हती.
तथापि, या खेळपट्टीवर धावा निघाल्या नसल्या, तरी भारताकडून मुरली विजय व साहा यांनी चांगली फलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेकडूनही हाशीम आमला आणि फाफ ड्यू प्लेसीस यांनी चांगली फलंदाजी केली. आमलाने १६७ आणि फाफ ड्यू प्लेसिसने १५२ चेंडूंचा सामना केला. त्यामुळे ही खेळपट्टी धोकादायक होती, असे म्हणता येणार नाही. खेळपट्टी टफ होती. खेळपट्टीशी जुळवून फलंदाजी करणे महत्त्वाचे होते. रोहित शर्मा वनडेत प्रभावी ठरत असताना कसोटीत मात्र तो तितका यशस्वी ठरला नाही. याविषयी लक्ष्मण म्हणतो.. वनडेत दोन द्विशतके झळकावणाऱ्या रोहितमध्ये ठासून गुणवत्ता भरलेली आहे. त्याने वनडेत स्वत:ला सिद्ध केले आहे.
नागपूर कसोटीत तो चांगल्या चेंडूवर बाद झाला; परंतु दिल्ली कसोटीतील पहिल्या डावात तो खराब पद्धतीने बाद झाला. रोहितने शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा करायला हवी. माझ्या मते, तो भारताचा मॅचविनर फलंदाज आहे आणि नक्कीच तो वनडेप्रमाणेच कसोटीतही स्वत:ला सिद्ध करील, असा
विश्वास वाटतो.’’(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Indo-Pak series depends on the government's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.