भारत-पाक मालिका श्रीलंकेत?
By admin | Published: November 24, 2015 12:22 AM2015-11-24T00:22:06+5:302015-11-24T00:22:06+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका श्रीलंकेत खेळविली जाण्याची आणि त्याची अधिकृत घोषणा २७ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका श्रीलंकेत खेळविली जाण्याची आणि त्याची अधिकृत घोषणा २७ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.
‘बीसीसीआय’ने याआधीच संयुक्त अरब अमिरात येथे खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते, तसेच पाकिस्तान क्रिकेट मंडळानेदेखील भारतात खेळण्यास नकार व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत दोन्ही देशांदरम्यान श्रीलंकेतील पर्याय उपलब्ध होता.
बीसीसीआयच्या उच्च सूत्रानुसार या मालिकेसाठी आता फक्त एक महिना बाकी आहे आणि अशा स्थितीत सुरुवातीचे दोन कसोटी, पाच वन-डे व दोन टी-२0 सामन्यांऐवजी त्यात फक्त तीन वन-डे आणि दोन टी-२0 सामने होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयसीसीचे विद्यमान चेअरमन शशांक मनोहर, पीसीबी अध्यक्ष शहरयार खान व नजम सेठी यांच्यादरम्यान येथे ईसीबीप्रमुख आणि ‘पाकिस्तान टास्क फोर्स’चे चेअरमन जाइल्स क्लार्क यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर मालिका आयोजनाच्या प्रक्रियेस वेग आला आहे.
सेठी आणि खान यांनी मनोहर यांच्यासोबतची बैठक ‘उपयुक्त’ होती, असे सांगितले होते; मात्र त्यांनी विस्तारात जास्त काही सांगितले नव्हते. त्यामुळे या मालिकेसाठी निर्माण झालेला अडथळा संपला असल्याचे संकेत मिळाले आहेत.
सूत्रांनुसार, ‘पीसीबीला अधिकृत घोषणा करण्याआधी नवाज शरीफ यांची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. शहरयार खान यांना लाहोर येथे जाऊन पंतप्रधानांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पंतप्रधानांकडून त्यांना हिरवा कंदील मिळाल्यानंतर ते याविषयी दुबई येथे जाऊन क्लार्क यांना त्यांचा निर्णय सांगतील. क्लार्क २७ नोव्हेंबरला अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.’
‘पीसीबी’ने श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) यांच्याशी संपर्क केला आणि ते मालिका आयोजित करण्यास इच्छुक आहेत. मालिका दोन स्टेडियमवर खेटरामा (आर. प्रेमदासा स्टेडियम) आणि पल्लेकल (कँडी) येथे होऊ शकते. सध्या श्रीलंकेत पाऊस जोरदार आहे; परंतु डिसेंबरच्या अखेरीस येथे हवामान चांगले राहण्याची शक्यता आहे. खेटरामा येथे काही टी-२0 सामने होणार आहेत; परंतु अधिकृत घोषणेनंतर एसएलसी त्यांचे वेळापत्रक तयार करेल.
२00९च्या लाहोर हल्ल्यानंतर पाकिस्तानात खेळण्यास कसोटी खेळणाऱ्या संघांनी नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धा आयोजित करण्याचे स्थळ यूएई बनले आहे.