भारत-विंडीज इलेव्हन सामना अनिर्णीत
By admin | Published: July 12, 2016 03:27 AM2016-07-12T03:27:34+5:302016-07-12T03:27:34+5:30
फिरकीपटू अमित मिश्राने अचूक मारा करीत चार बळी घेतले असले तरी वेगवान गोलंदाजांच्या साधारण कामगिरीमुळे भारत आणि वेस्ट इंडिज बोर्ड अध्यक्ष एकादश यांच्या दरम्यान
बासेटेरे : फिरकीपटू अमित मिश्राने अचूक मारा करीत चार बळी घेतले असले तरी वेगवान गोलंदाजांच्या साधारण कामगिरीमुळे भारत आणि वेस्ट इंडिज बोर्ड अध्यक्ष एकादश यांच्या दरम्यानचा दोन दिवसीय सराव सामना अनिर्णीत संपला. शाई होपची नाबाद शतकी खेळी दुसऱ्या व अखेरच्या दिवशी यजमान संघातर्फे ठळक वैशिष्ट्य ठरली. विंडीज बोर्ड अध्यक्ष एकादशने दिवसअखेर ७ बाद २८१ धावांची मजल मारली होती.
विंडीजतर्फे सात कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व करणाऱ्या होपने खेळपट्टीवर ३५५ मिनिटे तळ ठोकताना २२९ चेंडू खेळले. त्यात त्याने १५ चौकार ठोकले. भारतातर्फे लेगस्पिनर अमित मिश्राने चमकदार कामगिरी करीत ६७ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याआधी, भारताने ६ बाद २५८ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला होता.
रविवारी झालेल्या पावसानंतर भारतीय वेगवान गोलंदाजांना अनुकूल स्थितीचा लाभ घेण्याची चांगली संधी होती; पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भुवनेश्वर कुमार आणि दुखापतीतून सावरलेला मोहम्मद शमी यांनी चांगली सुरुवात केली; पण त्यांना सातत्य राखता आले नाही. भुवनेश्वरने यजमान संघाचा कर्णधार लियोन जॉन्सनला तंबूचा मार्ग दाखविला. शमीने उजव्या यष्टीबाहेर फलंदाजांना त्रस्त केले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दिशाहीन मारा केला. कर्णधार विराटने त्यानंतर ईशांत शर्मा व उमेश यादव यांना पाचारण केले. या दोन्ही गोलंदाजांनाही यश मिळाले नाही. उपाहारानंतर मिश्राने चंद्रिकाला बाद केले तर त्यानंतरच्या चेंडूवर जर्मेन ब्लॅकवूड यष्टिचित झाला. मिश्राने
चार बळी घेतले. कुमार, शमी व
उमेश यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. बळीचा विचार करता ईशांतची पाटी कोरीच राहिली.