इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जाॅर्जने पटकावले विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 09:11 AM2023-09-11T09:11:28+5:302023-09-11T09:13:28+5:30

Indonesia Masters Badminton Tournament: भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील उगवता तारा किरण जाॅर्ज याने रविवारी पुरुष एकेरीत जपानच्या कू ताकाहाशी याला सरळ गेममध्ये पराभूत करत इंडोनेशिया मास्टर्स सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. 

Indonesia Masters Badminton Tournament: Kiran George wins the title | इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जाॅर्जने पटकावले विजेतेपद

इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जाॅर्जने पटकावले विजेतेपद

googlenewsNext

मेदान - भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील उगवता तारा किरण जाॅर्ज याने रविवारी पुरुष एकेरीत जपानच्या कू ताकाहाशी याला सरळ गेममध्ये पराभूत करत इंडोनेशिया मास्टर्स सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. जागतिक पातळीवर सुपर १०० पातळीवरील हे किरणचे दुसरे विजेतेपद आहे.

कोच्चीच्या या २३ वर्षीय खेळाडूने ५६ मिनिटे रंगलेल्या लढतीत जगात ८२ व्या क्रमांकावर असलेल्या ताकाहाशी याला २१-१९, २२-२० असे पराभूत केले. 
बंगळुरूत पीपीबीए येथे सराव करणारा किरण सामन्यात सुरुवातीला १-४ असा पिछाडीवर होता. त्यानंतर त्याने ८-८ अशी बरोबरी साधत आघाडी घेतली. किरणने १८-१५ अशी आघाडी वाढवली. ताकाहाशीने पिछाडी १९-२० अशी कमी केली. त्यानंतर किरणने गेम जिंकत आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. ६-६ अशा बरोबरीनंतर किरणने १६-११ अशी आघाडी घेतली. ताकाहासीने जोरदार पुनरागमन करताना १९-१९ अशी बरोबरी साधली. किरण यावेळी पहिला मॅच पाॅइंट घेण्यात अपयशी ठरला, पण दुसरा मॅच पाॅइंट घेत त्याने लढत जिंकली. 

माजी राष्ट्रीय विजेता जाॅर्ज थाॅमस यांचा मुलगा असलेल्या किरणने ओडिशा ओपन आणि पोलिस ओपन जिंकली होती. तो गतवर्षी डेन्मार्क मास्टर्समध्ये उपविजेता ठरला होता. यंदा जानेवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम ४३ व्या क्रमांकावर पोहोचलेल्या किरणने मे-जूनमध्ये थायलंड ओपनमध्ये चीनचा आघाडीचा खेळाडू शी युकी आणि वेंग होंगयांग याला पराभूत करत आपले कौशल्य दाखविले होते. 

धक्कादायक निकालांवर द्यावे लक्ष
प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीचे संचालक आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक विमल कुमार यांनी सांगितले की, हा विजय शानदार आहे. संधीचे सोने करणे आणि सातत्याने चांगली कामगिरी केल्यावरच असे जेतेपद साकारता येते. देशातील अन्य खेळाडूही युवा आणि चांगले आहेत. त्यामुळे किरणच्या या कामगिरीमुळे खूप आनंद झाला आहे. या विजेतेपदानंतर विश्रांती करण्याऐवजी किरणने तयारी सुरू ठेवायला हवी. कारण तो आता हाँगकाँगच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याच्याकडे गमावण्यासारखे काही नाही. त्यामुळे त्याने उलटफेर करण्यावर लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Indonesia Masters Badminton Tournament: Kiran George wins the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.