पायाभूत सुविधा ‘अपडेट’ हव्या, प्रशिक्षकांचंही मूल्यमापन करा : क्रीडामंत्री
By admin | Published: April 19, 2017 07:16 PM2017-04-19T19:16:17+5:302017-04-19T19:16:17+5:30
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या(साई) काही केंद्रांची अवस्था दयनीय आहे. कोचेस देखील आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत नसल्याबद्दल
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या(साई) काही केंद्रांची अवस्था दयनीय आहे. कोचेस देखील आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत नसल्याबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी बुधवारी तीव्र नापसंती व्यक्त केली. साई केंद्रांमधील सुविधा तसेच कोचेसच्या कामगिरीबद्दलचा अहवाल त्यांनी मागविला आहे.
गोयल म्हणाले, ‘मी अलीकडे रायपूरच्या साई केंद्राचा दौरा केला. साईचे केंद्र सामाजिक कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचे काम स्थानिक यंत्रणा करीत असल्याबद्दल मी आश्चर्यचकित झालो. रायपूरचे साई केंद्र राज्य शासनाच्या स्टेडियममध्ये आहे. स्थानिक महापालिका केंद्राचा परिसर लग्नसमारंभासाठी भाड्याने देते. यातून मोठ्या रकमेचा अपहार होत असावा. साई केंद्रातील सुविधांची अवस्था अत्यंत बिकट आहे. ’ ते पुढे म्हणाले,‘साई केंद्रात कोचेस आहेत पण त्यांच्याकडे खेळाडू उपलब्ध नाहीत. फुटबॉलसाठी केवळ ११ खेळाडू असतील तर दोन संघ कसे तयार करणार? मी कोचेसला खडसावले. हे चालणार नाही, असेही बजावले. आम्हाला
कोचेसच्या कामगिरीची समीक्षा करावी लागेल. अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत किती खेळाडू घडविले हे पाहिल्यानंतरच यापुढे कोचेसच्या वेतनात वाढ केली जाईल. याशिवाय कोचेसचा स्वत:चा फिटनेस किती आहे यावर भर दिला जाईल. साई कोचेस वेतनवाढ मागतात पण आपण किती मेहनत घेतो याचे आत्मभान बाळगत नसल्याचे मला दिसून आले आहे.’