बेल्जियमविरुद्ध सुरुवातीला आघाडी मिळविणे आवश्यक
By admin | Published: August 14, 2016 04:00 AM2016-08-14T04:00:17+5:302016-08-14T04:00:17+5:30
उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन ! आता खेळाडूंच्या फिटनेसची व मानसिक कणखरतेची खरी कसोटी लागणार आहे. भारताने सुरुवातीच्या
- धनराज पिल्ले लिहितो...
उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन ! आता खेळाडूंच्या फिटनेसची व मानसिक कणखरतेची खरी कसोटी लागणार आहे. भारताने सुरुवातीच्या तीनपैकी दोन सामन्यांत विजय मिळवत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली, पण नेदरलँड व कॅनडाविरुद्धच्या लढतींमध्ये भारतीय संघांकडून चाहत्यांना अपेक्षित खेळ बघायला मिळाला नाही.
आता भारतीय संघाकडून वारंवार होत असलेल्या चुकांबाबत चर्चा करू. मी रेफरीकडून कार्ड मिळण्याबाबत आणि प्रतिस्पर्धी संघाला पेनल्टी कॉर्नर बहाल करण्याबाबत चर्चा करीत आहे. पेनल्टी कॉर्नरचा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक संघात त्यासाठी स्पेशालिस्ट खेळाडू आहेत. त्यामुळे आपला संघ अडचणीत येऊ शकतो. विद्यमान हॉकीमध्ये कुठल्याही संघासाठी नऊ खेळाडूंसह विजय मिळवणे शक्य नसते. कारण दहा वर्षांमध्ये हॉकीमध्ये बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे सीनिअर खेळाडूंना माझा सल्ला आहे की, रेफरीकडून कार्ड मिळू नये यासाठी प्रयत्नशील असावे. जर असे घडले नाही तर संघाची पुढील वाटचाल खडतर होईल.
बेल्जियमविरुद्ध उपांत्यपूर्व लढत महत्त्वाची आहे. यापूर्वीच्या लढतीचा विचार न करता भारताने बेल्जियमविरुद्धच्या लढतीत चांगली कामगिरी कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील असावे. प्रत्येक लढत वेगळी असते. भारताला एस.व्ही. सुनील व त्याच्या आघाडीच्या फळीकडून मोठ्या आशा आहेत. त्याचसोबत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध पेनल्टी कॉर्नर कसे मिळवता येतील, यासाठी त्यांनी प्रयत्नशील असावे. त्यामुळे फॉर्मात असलेल्या रुपिंदर व रघुनाथ यांना गोल नोंदविण्याची संधी मिळेल. भारतीय संघाने सुरुवातीला गोल नोंदवीत आघाडी घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे सामन्यावर नियंत्रण मिळवता येते. भारतीय खेळाडूंनी चेंडूवर नियंत्रण राखले त्यावेळी अनुकूल निकाल मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतीय खेळाडूंनी त्यावर भर द्यावा. भारतीय खेळाडूंनी आत्ममश्गुल न राहता आत्मविश्वासाने खेळावे.
सुरुवातीच्या पाच मिनिटांच्या खेळामध्ये सरदार, मनप्रीत, रघुनाथ यांनी प्रतिस्पर्धी संघातील कच्चे दुवे हेरून कुणाला लक्ष्य करायचे, हे निश्चित करायला हवे. प्रशिक्षकांची सकारात्मकता संघाचा आत्मविश्वास उंचावण्यास महत्त्वाची ठरेल. बेल्जियमविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला तर स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणित होईल. जय हिंद ! (टीसीएम)