जखमी झालेला पहिलवान झुंझारपणे लढला
By admin | Published: August 21, 2016 08:27 PM2016-08-21T20:27:48+5:302016-08-21T20:27:48+5:30
कुस्ती स्पर्धेत ७४ किलो वजनीगटात पुरुषांच्या फ्री स्टाईल फायनलमध्ये रशियाचा पहिलवान एनियर गेदेवने डोक्यातून रक्त वाहत असतानाही पदक जिंकण्यासाठी लढत चालूच ठेवली
ऑनलाइन लोकमत
रियो डि जेनेरिओ, दि. 21 - खेळाडूला आपल्या देशासाठी पदक जिंकणे किती महत्त्वपूर्ण असते त्याचे एक उदाहरण रिओमध्ये पाहावयास मिळाले. रिओ आॅलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत ७४ किलो वजनीगटात पुरुषांच्या फ्री स्टाईल फायनलमध्ये रशियाचा पहिलवान एनियर गेदेवने आपल्या डोक्यातून रक्त वाहत असतानाही पदक जिंकण्यासाठी ही लढत चालूच ठेवली. खेळामध्ये खासकरून अशी घटना कमीच पाहावयास मिळत असते. कारण खेळाडू अथवा अॅथलिटला दुखापत झाल्यानंतर काही काळ खेळ थांबविण्यात येतो; मात्र गेदेवच्या लढतीत असे झाले नाही़ रशियाचा पहिलवान गेदेव सामन्यादरम्यान पूर्णत: जखमी झाला होता. त्याच्या डाव्या डोळ्याच्या वरील बाजूस दुखापत झाली होती़ त्यातून रक्त प्रवाह सुरु होता़ २९ वर्षीय गेदेव दुखापतीनंतरदेखील ईराणचा पहिलवान हसन यजदानीविरुद्ध खेळण्यास उतरला़ फायनल सामन्यादरम्यान त्याच्या जखमातून रक्त वाहत होते मात्र गेदेव आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकू इच्छित होता़ सामन्यादरम्यान पहिलवानाची जर्सी पूर्णत: लाल झाली होती़ वारंवार रक्ताचे थेंब टपकत असल्या कारणाने मॅटदेखील पुसावे लागत होते़; मात्र प्रबळ इच्छाशक्तीमुळे गेदेवने आपल्या डोक्याला पट्टी बांधून सामना लढत राहिला़ तो पराभव मानणे अथवा माघार घेण्यास सज्ज नव्हता़ तो रिंगणात उभा होता़ पहिल्यांदा तो आघाडीवर होता; मात्र सामन्याच्या अखेरीस यजदानीने स्कोअर बरोबरीत आणले़ यानंतर मॅच रेफरीने ईराणी पहिलवानाला विजेता घोषित केले़ दरम्यान, गेदेव सुवर्ण जिंकू शकला नाही; मात्र त्याने सर्वांचे मन जिंकले एवढे मात्र नक्की़.