धोनीविरुद्ध चौकशी समिती
By admin | Published: June 21, 2015 01:02 AM2015-06-21T01:02:10+5:302015-06-21T01:02:10+5:30
भारताचा एकदिवसीय आणि टी-२० सामन्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या कंपनीत असणारा सहभाग
नवी दिल्ली : भारताचा एकदिवसीय आणि टी-२० सामन्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या कंपनीत असणारा सहभाग शोधण्यासाठी ‘बीसीसीआय’ने चौकशी समिती स्थापन केली आहे.
महेंद्रसिंग धोनीचा अत्यंत
जवळचा मित्र अरुण पांडे याने ही रिती स्पोर्टस् कंपनी सुरूकेली असून, धोनीसह सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा हे या कंपनीत सहभागी आहेत. या कंपनीकडे आयपीएल फ्रँच्याईजी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या मार्केटिंगची जबाबदारी होती. धोनीची या कंपनीत १५ टक्के भागीदारी असल्याचे मानले जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बीसीसीआय’ने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष जगमोहन दालमिया स्वत: या समितीत असून, ज्योतिरादित्य सिंदिया आणि के. पी. कजारिया हे अन्य दोन सदस्य आहेत. दरम्यान, धोनी हा आपल्या कंपनीचा भागधारक राहिला नसल्याचे २0१३ मध्ये ‘रिती स्पोर्टस्’ने स्पष्ट केले होते; पण बीसीसीआय अद्याप या प्रकरणात रस घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. धोनी आणि पांडे हे इतर तीन कंपन्यांमध्ये एकत्र आहेत. रिती स्पोर्टस्मधील धोनीची भागीदारी ही थोड्या काळाकरिता आणि मागील काही देणी चुकती करण्याकरिता होती, असे पांडे यांनी याअगोदरच स्पष्ट केले आहे. धोनीचे इतर उद्योग आणि गुंतवणूकही आता रडारवर आल्याचे दिसत आहे.
अहवालानंतरच भूमिका स्पष्ट करू
चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच आम्ही याबाबत जाहीर वाच्यता करू, असे दालमिया यांनी एका दैनिकाशी बोलताना स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की धोनी बाबतीत म्हणाल तर माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे.
मी सांगितले होते की, अजित चंदीला विरुध्द अनुशासनात्मक कारवाईची मागणी अंतिम निर्णयापर्यंत लांबला आहे. धोनीच्या भागीदारी विषयी मला विचारण्यात आले तेव्हा मी एवढच म्हणालो होतो की, माझा इरादा बीसीसीआयने २०१३ मध्ये घेतलेल्या निर्णयाला लागू करण्याचा आहे.
त्यावेळी मी सांगितले होते की, जर कोणता खेळाडू कुठल्याही क्रीडा व्यवस्थापक कंपनीशी कोणत्याही स्वरुपात जोडला गेला असेल, तर त्याची माहिती त्याने द्यावी.