रिओ आॅलिम्पिकच्या खराब कामगिरीची चौकशी सुरू
By admin | Published: September 9, 2016 12:12 AM2016-09-09T00:12:47+5:302016-09-09T00:12:47+5:30
क्रीडा मंत्रालयाने रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीची ‘संपूर्ण समीक्षा’ सुरू केली
नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीची ‘संपूर्ण समीक्षा’ सुरू केली असून, त्यांनी या खेळाच्या महाकुंभात सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून त्यांची प्रतिक्रिया आणि सूचनाही मागितल्या आहेत.
गेल्या महिन्यात दोन आठवडे चालणाऱ्या या महाकुंभात भारताची कामगिरी निराशाजनक ठरली होती. भारतातर्फे फक्त पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये रौप्य आणि साक्षी मलिकने कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. क्रीडा मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात म्हटले, की क्रीडामंत्री विजय गोयल यांनी क्रीडा मंत्रालयांतर्गत भारताच्या रिओ आॅलिम्पिक २०१६ मधील कामगिरीची संपूर्ण समीक्षा करण्याचा निर्णय घेतला. क्रीडामंत्र्यांनी रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वैयक्तिकपणे पत्र लिहिले असून, त्यांच्याकडून प्रतिक्रिया आणि सूचना मागितल्या आहेत. खेळाडू कधीही वैयक्तिक अथवा मेलद्वारे आपल्या सूचना अथवा प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात, असेही त्यांनी कळवले आहे.
या पत्रात क्रीडामंत्र्यांनी कामगिरी सुधारण्यावर भर दिला आहे. ज्यामुळे जागतिक पातळीवर खेळाडूंचा एक गट बनवला जाऊ शकेल आणि मूलभूत सुविधांना आणखी मजबूत केल्या जाऊ शकतील. रिओ आॅलिम्पिकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी आगामी तीन आॅलिम्पिक लक्षात घेऊन एक ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याची घोषणादेखील केली होती.
गोयल यांच्या विभागाने निवेदनात लिहिले, ‘मंत्रालयाने भारतीय आॅलिम्पिक संघटनेलादेखील रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या कामगिरीच्या प्रतिक्रिया आणि भविष्यात कामगिरी उंचावण्यासाठी पावले उचलण्याविषयी माहिती देण्यास कळवले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया राष्ट्रीय क्रीडा महासंघाकडूनही मागविण्यात येणार आहेत. क्रीडामंत्री याविषयी आयओए आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाशी विस्तृत चर्चेसाठी बैठकही बोलावणार आहेत.’
चौकशीसाठी मंत्रालयाचे काही अधिकारी साईच्या काही केंद्रांचा दौरादेखील करणार आहेत. ‘मंत्री काही अॅकॅडमी आणि साई केंद्राचादेखील दौरा करणार आहेत. ज्यामुळे खेळाडूंना ट्रेनिंगसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्यांच्या कामगिरीतील सुधारणेची माहिती मिळू शकेल. या महिन्याच्या १७ तारखेला ते हैदराबाद येथे गोपीचंद बॅडमिंटन अॅकॅडमीचा दौरा करणार आहेत. जेथे ते खेळाडू, प्रशिक्षक आणि अन्य स्टाफशी चर्चा करतील. ते हैदराबाद येथील ‘साई’ केंद्राचादेखील दौरा करणार आहेत.’