घालीन लोटांगण...
By admin | Published: January 20, 2015 11:53 PM2015-01-20T23:53:04+5:302015-01-20T23:53:04+5:30
भारतीय फलंदाजांनी इंग्लंडचे वेगवान गोलंदाज फिन व अँडरसन यांच्यापुढे लोटांगण घातले.
तिरंगी मालिका : फिन व अँडरसनचा अचूक मारा, इंग्लंडची भारतावर ९ गडी राखून मात
ब्रिस्बेन : भारतीय फलंदाजांनी इंग्लंडचे वेगवान गोलंदाज फिन व अँडरसन यांच्यापुढे लोटांगण घातले. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत भारताला मंगळवारी सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने भारताचा ९ गडी राखून पराभव करून बोनस गुणासह विजय मिळविला आणि भारताचा अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग खडतर केला. स्टीव्हन फिन व जेम्स अँडरसन यांच्या अचूक माऱ्यापुढे भारताचा डाव ३९.३ षटकांत १५३ धावांत संपुष्टात आला. शिखर धवन (१), विराट कोहली (४), सुरेश रैना (१), अक्षर पटेल (०), भुवनेश्वर (५) व मोहंमद शमी (१) यांना मोठी खेळी करता आली नाही.
वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारताचे आघाडीचे ५ फलंदाज १९व्या षटकापर्यंत तंबूत परतले होते. त्या वेळी धावफलकावर केवळ ६७ धावांची नोंद होती. फिनने ३३ धावांच्या मोबदल्यात ५, तर अँडरसनने १८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. स्टुअर्ट बिन्नीचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक झाली. बिन्नीने ५५ चेंडूंना सामोरे जाताना ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४४ धावा फटकाविल्या. कर्णधार महेंद्रसिंह धोनी (३४) व बिन्नी यांनी सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला; पण ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर तळाच्या फलंदाजांना विशेष चमक दाखविता आली नाही. अजिंक्य रहाणेने ३३ धावांचे योगदान दिले. इंग्लंडने २२ षटके शिल्लक राखून विजय साकारला आणि ५ गुणांची कमाई केली. त्यात बोनस गुणाचा समावेश आहे. सलामीवीर इयान बेलने ९१ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकारांच्या साह्याने नाबाद ८८ धावांची खेळी केली, तर जेम्स टेलरने ६३ चेंडूंमध्ये नाबाद ५६ धावा फटकावल्या. टेलरच्या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे. बेल व टेलर यांनी १३१ धावांची अभेद्य भागीदारी केली. भारतीय फलंदाजीच्यादरम्यान खडतर वाटत असलेली गाबाची खेळपट्टी इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान सहज वाटत होती. टेलरने चौकार ठोकून इंग्लंडला २७.३ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात १५६ धावांची मजल मारून दिली. (वृत्तसंस्था)
च्दोन सामन्यांत ९ गुणांची कमाई करणारा आॅस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानावर असून, दोन सामने खेळणाऱ्या इंग्लंडच्या खात्यावर ५ गुणांची नोंद आहे. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळविणे आवश्यक आहे.
धावफलक
भारत : अजिंक्य रहाणे झे. टेलर गो. फिन ३३, शिखर धवन झे. बटलवर गो. अँडरसन १, अबांती रायुडू झे. बटलर गो. फिन २३, विराट कोहली झे. बटलर गो. फिन ४, सुरेश रैना यष्टिचीत बटलर गो. अली १, महेंद्रसिंह धोनी झे. बटलर गो. फिन ३४, स्टुअर्ट बिन्नी झे. मॉर्गन गो. अँडरसन ४४, अक्षर पटेल त्रि. गो. फिन ०, भुवनेश्वर कुमार त्रि. गो. अँडरसन ५, मोहंमद शमी झे. अली गो. अँडरसन १, उमेश यादव नाबाद ०. अवांतर : ७. एकूण : ३९.३ षटकांत सर्व बाद १५३. बाद क्र म : १-१, २-५७, ३-६४, ४-६५, ५-६७, ६-१३७, ७-१३७, ८-१४३, ९-१५३, १०-१५३. गोलंदाजी : अँडरसन ८.३-२-१८-४, व्होक्स ७-०-३५-०, ब्रॉड ७-०-३३-०, फिन ८-०-३३-५, मोईन ९-०-३१-१.
इंग्लंड : इयान बेल नाबाद ८८, मोईन अली झे. कोहली गो. बिन्नी ८, जेम्स टेलर नाबाद ५६. अवांतर : ४. एकूण २७.३ षटकांत १ बाद १५६. बाद क्रम : १-२५. गोलंदाजी : बिन्नी ७-०-३४-१, भुवनेश्वर २-०-१८-०, यादव ६-०-४२-०, शमी ४-०-२३-०, पटेल ७.३-०-३२-०, रैना १-०-७-०.
कठोर मेहनतीचे फळ मिळाले : फिन
भारतावर ९ गड्यांनी विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठविणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन याने हे कठोर मेहनतीचे फळ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
तिरंगी मालिकेतील सामन्यात भारताविरुद्ध ५ गडी बाद केल्यानंतर स्टीव्हन फिन म्हणाला, ‘‘कठोर मेहनतीचे फळ मिळाले. वर्षभरात मी जो घाम गाळला, त्याचा हा परिणाम आहे. गेल्या वर्षी आॅस्ट्रेलिया दौऱ्यातून मला परत पाठविण्यात आले होते. तेव्हापासून मी गोलंदाजीवर मेहनत घेतली. संघात पुनरागमन करून चांगली कामगिरी करण्याचा माझा संकल्प होता. तो आज पूर्ण झाल्याचे समाधान आहे.’’
२५ वर्षांच्या स्टीव्हनने ३३ धावांत भारताचा अर्धा संघ बाद केला. यावर तो म्हणाला, ‘‘माझ्या टोकाकडून खेळपट्टी चांगलीच उसळी घेत होती. मी फुललेंथ चेंडू टाकल्याने चेंडू आणखीच उसळले. हे चेंडू खेळणे सोपे नसल्याचे माझ्या ध्यानात येताच मी असाच मारा करण्यावर भर दिला. आता आॅस्ट्रेलियाविरुद्ध सरस कामगिरी करायची आहे.’’
या मालिकेत आणि पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरील संघाविरुद्ध्न खेळत असल्याने तिरंगी मालिका इंग्लंडसाठी कठीण असल्याची कबुली फिनने दिली. पण, भारताला पराभूत केल्याने आत्मविश्वास उंचावल्याचे त्याने नमूद केले.
पराभवामुळे धोनी उखडला
इंग्लंडविरुद्ध ९ विकेटनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी निराश झाला. ‘कामगिरी सुधारण्यासाठी नेटमध्ये कसून सराव करण्याची आवश्यकता आहे किंवा हॉटेलमध्ये परतून विश्रांती घेण्याची गरज आहे, हे बघावे लागेल,’ अशी प्रतिक्रिया धोनीने व्यक्त केली.
भारताला तिरंगी मालिकेत आॅस्ट्रेलियानंतर मंगळवारी इंग्लंडविरुद्ध सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताने संघर्ष तरी केला होता; पण इंग्लंडविरुद्ध मात्र भारतीय फलंदाज व गोलंदाजांची कामगिरी ‘घालीन लोटांगण’ अशा दर्जाची होती.
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला, ‘‘आम्ही चांगली फलंदाजी केली, असे मला वाटत नाही. विशेषत: नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर अशी फलंदाजी अपेक्षित नव्हती. आमच्या फलंदाजांना चांगली सुरुवात करता आली नाही, त्याचप्रमाणे भागीदारीही झाली नाही. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी भागीदारी होण्याची गरज असते; पण आमचे फलंदाज त्यात अपयशी ठरले. चेंडू जर फटका मारण्यासाठी असेल, तर त्यावर फटका मारावा आणि चेंडू अचूक असेल, तर सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.’’
शानदार विजय : मॉर्गन
च्तिरंगी मालिकेत मंगळवारी भारताविरुद्ध मिळविलेला विजय शानदार होता, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने व्यक्त केली.
च्सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत मॉर्गन म्हणाला, ‘‘सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळविल्यामुळे आनंद झाला. त्यात खेळाडूंची वैयक्तिक कामगिरीही महत्त्वाची आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताविरुद्धच्या लढतीत शानदार पुनरागमन केले आणि बोनस गुणासह विजय मिळविला.’’
च्स्टीव्हन फिनने अचूक मारा केला. चेंडूला अधिक उसळी मिळविण्यात तो यशस्वी ठरला. त्यामुळे त्याला सर्वाधिक ५ बळी मिळविता आले. याव्यतिरिक्त जेम्स अँडरसनने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजविता आले. स्विंग मिळायला लागल्यानंतर अंडरसन त्याचा लाभ घेतो.
१३५चेंडू शिल्लक ठेवून इंग्लंडने भारतावर विजय साजरा केला. हा इंग्लंडचा भारतावर सर्वांत मोठा विजय आहे. यापूर्वी इंग्लंडने २००४मध्ये टेंटब्रिज येथे १०० हून अधिक चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळविला होता.
0९ गडी राखून मिळवलेला इंग्लंडचा हा भारताविरुद्धचा दुसरा विजय आहे. यापूर्वी १९८२मध्ये हेडिंग्लेमध्ये इंग्लंडने भारतावर ९ विकेटनी विजय मिळविला होता.
0१वेळ इंग्लंडच्या दोन गोलंदाजांनी इंग्लंडबाहेर एकाच सामन्यात प्रत्येकी ४ बळी मिळविण्याची किमया केली आहे. इंग्लंडमध्ये हे तीनदा घडले आहे.
0६गोलंदाजांनी ब्रिस्बेनमध्ये सामन्यात ५ बळी घेण्याचा सन्मान मिळविला आहे.
१५३ही भारताची इंग्लंडविरुद्धची सर्वांत निचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी १९९६मध्ये हेडिंग्ले येथे १५८मध्ये भारताचा डाव संपला होता.
५ वेळा अजिंक्य रहाणे याला स्टीव्ह फिन याने बाद केले आहे. इतर कोणताही गोलंदाज त्याला दोनपेक्षा अधिक वेळा बाद करू शकलेला नाही. फिनने सुरेश रैनालाही पाच वेळा बाद केले.
१८वर्षांनंतर भारताने इंग्लंडकडून त्रयस्थ देशात एकदिवसीय सामन्यात हार पत्करली आहे.