प्रेरणादायी प्रवास, गवंडी मजूर सख्खे भाऊ बनले राष्ट्रीय खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 03:26 PM2017-12-17T15:26:39+5:302017-12-17T15:26:49+5:30
कासेगाव (ता. वाळवा) येथील दोन सख्ख्या बंधूंनी स्वकर्तृत्वाने गवंडी मजूर ते राष्ट्रीय खेळाडू असा प्रेरणादायी प्रवास करत कासेगावचे नाव सर्वदूर पोहोचवले आहे.
प्रताप बडेकर
कासेगाव (जि. सांगली) : कासेगाव (ता. वाळवा) येथील दोन सख्ख्या बंधूंनी स्वकर्तृत्वाने गवंडी मजूर ते राष्ट्रीय खेळाडू असा प्रेरणादायी प्रवास करत कासेगावचे नाव सर्वदूर पोहोचवले आहे.
कासेगाव येथील शिवगर्जना व्यायाम मंडळाचे खेळाडू रवींद्र कुमावत व सतपाल कुमावत यांनी कबड्डीत राष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. रवींद्र कुमावत दोन वर्षांपासून प्रो-कबड्डी स्पर्धेत बंगाल वॉरियर्स, कोलकाता संघाकडून खेळत आहे. आक्रमक चढाईपटू म्हणून तो ओळखला जातो. रवींद्रने याआधी १४, १६, १७, १९ वर्षाखाली महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे. त्याचा लहान भाऊ सतपाल कुमार गटातून महाराष्ट्र संघात खेळत आहे. मागील सत्रात काही सामन्यांत खेळताना त्याने चमकदार कामगिरी केली आहे. सतपाल उंचापुरा,आक्रमक चढाईपटू असून त्याने धमाकेदार एन्ट्रीने सर्वांना प्रभावित केले आहे. मागील आठवड्यात वाळवा येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतून त्याने कुमार गटाच्या महाराष्ट्र संघात स्थान मिळवले आहे. १२ डिसेंबरपासून ओरिसा येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेसाठी तो रवाना झाला आहे. या दोघांनाही शिवगर्जना व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप पाटील व दिलीप पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
या दोघा प्रतिभाशाली भावांची घरची परिस्थिती गरिबीची आहे. वडील गवंडीकाम करत असून, या कुटुंबाला रहायला स्वत:चे घरही सध्या अस्तित्वात नाही! सध्या हे कुटुंब कासेगाव येथे भाड्याच्या खोलीत रहात आहे.
रवींद्र व सतपाल दोघेही वडिलांना गवंडीकामात मदत करत असतात. स्पर्धेचा कालावधी सोडल्यास दोघेही गवंडी मजूर म्हणून काम करतात, पण यादरम्यान कबड्डीच्या सरावात खंड पडत नाही.
राजस्थानातून येऊन कासेगावात स्थायिक
सुमारे २५ वर्षांपूर्वी रमेश कुमावत पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थानहून कासेगावला आले. त्यानंतर ते कासेगावातच स्थायिक झाले. मतदान, रेशन कार्ड, आधारकार्ड आदीची नोंद कासेगावातीलच आहे. रवींद्र कला शाखेच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असून, सतपाल पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्यांच्या कुटुंबात एकूण ११ लोक रहात आहेत. त्यामध्ये आई, वडील रवींद्र, सतपाल, प्रकाश व बिरजू हे आणखी दोघे विवाहित भाऊ, बहीण सुनीता व दोन भावांच्या पत्नी व त्यांची दोन मुले यांचा समावेश आहे.
वडिलांची जिद्द
रवींद्र व सतपालचे वडील रमेश कुमावत यांनी दोघांना घडविण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत. त्यांना नेहमीच खेळासाठी प्रोत्साहित केले आहे. अकरा जणांचे कुटुंब सांभाळताना वडिलांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रवींद्र व सतपाल यांना खेळताना काही महिन्यांपूर्वी गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी शस्त्रक्रियेसाठीचा एक लाखाचा खर्च वडिलांनी पोटाला चिमटा देऊन केला.