Commonwealth Games 2018: दहावीची परीक्षा सोडून गोल्डकोस्टला गेला अन् 'गोल्ड' घेऊन आला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 12:38 PM2018-04-13T12:38:16+5:302018-04-13T12:40:27+5:30

१५ वर्षांच्या अनिश भानवालाचा थक्क करणारा प्रवास

inspiring journey of anish bhanwala indias youngest ever commonwealth gold medalist | Commonwealth Games 2018: दहावीची परीक्षा सोडून गोल्डकोस्टला गेला अन् 'गोल्ड' घेऊन आला

Commonwealth Games 2018: दहावीची परीक्षा सोडून गोल्डकोस्टला गेला अन् 'गोल्ड' घेऊन आला

Next

गोल्डकोस्ट: वयाच्या १५ व्या वर्षी सर्वसामान्य मुलं दहावीची परीक्षा देतात. जानेवारी महिना उजाडला की मुलांचा अभ्यास जोरात सुरू होतो. परीक्षेचं वेळापत्रक पाहून अभ्यासाचे तास वाढवले जातात. मार्च महिन्यात परीक्षा असल्यानं तर दिवस-रात्र अभ्यास सुरू होतो. देशभरातले विद्यार्थी असे अभ्यासात बुडाले असताना, हरियाणातला १५ वर्षांचा अनिश भानवाला मात्र याचवेळी इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन वर्ल्डकप आणि इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ज्युनियर वर्ल्डकपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत होता. सध्या १५ वर्षांची मुलं दहावीची परीक्षा देऊन सुट्टी एन्जॉय करत आहेत, तर अनिशनं राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णवेध घेताना अनेक विक्रम इतिहासजमा केलेत.

२६ सप्टेंबर २००२ रोजी हरियाणाच्या सोनीपत जन्मलेल्या अनिशचं बालपण इतरांच्या बालपणापेक्षा खूपच वेगळं. घरातलं कोणीही नेमबाजीत नसताना, कुटुंबातल्या कोणालाच तशी आवडही नसताना अनिशला नेमबाजीचं आकर्षण वाटू लागलं. मात्र तरीही अनिशच्या वडिलांनी त्याला सतत प्रोत्साहन दिलं. आपला मुलगा वेगळं काहीतरी करु पाहतोय, हे वडिलांनी ओळखलं आणि ते ठामपणे अनिशच्या पाठिशी उभे राहिले. मग वयाच्या सातव्या वर्षी अनिशच्या हाती पिस्तुल आलं आणि कर्नालच्या शाळेतल्या शूटिंग रेंजमधून सुरू झाला एक थक्क करणारा प्रवास. 

हरियाणात काही काळ सराव केल्यावर अनिश चांगल्या सोयी मिळाव्यात म्हणून दिल्लीला गेला. अथक मेहनत सुरूच होती. सर्वसामान्य मुलं दहावीची तयारी करत असताना अनिशनं इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन वर्ल्डकप आणि इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ज्युनियर वर्ल्डकपची तयारी सुरू केली. गेल्याच महिन्यात झालेल्या या दोन्ही स्पर्धांमध्ये अनिशनं सुवर्णपदकांची कमाई केली. दहावीची परीक्षा दिल्यावर इतर मुलं सुट्टीचा प्लान करतात. मात्र अनिशनं एप्रिलमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी सुरू केली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दोन स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांना गवसणी घातल्यामुळे अनिशचा आत्मविश्वास उंचावला होता. राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला स्वत:कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र दहावीची परीक्षा असल्यानं स्पर्धेतल्या सहभागावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. राष्ट्रकुल स्पर्धा की दहावीची परीक्षा असा प्रश्न निर्माण झाला. अखेर दोन पेपरला न बसण्याची परवानगी मिळाली आणि अनिशची राष्ट्रकुलवारी निश्चित झाली.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या अनिशचं नाव फारसं कोणालाच माहित नव्हतं. दोन मानाच्या स्पर्धा जिंकूनही अनिश भारतासाठी अपरिचितच होता. मात्र अनिश गोल्डकोस्टमध्ये दाखल झाला, तोच 'गोल्ड' जिंकण्याच्या उद्देशानं. तगडे प्रतिस्पर्धी, मोठ्या स्पर्धेचं दडपण, अनुभवाची कमतरता अशा प्रतिकूल स्थितीत शानदार कामगिरी करण्याचं आव्हान अनिशसमोर होतं. अनिशनं हे आव्हान अगदी लिलया पेललं. अंतिम फेरीत तर अनिशनं कमाल केली. अनिशनं या फेरीत ३० गुण घेत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं. त्यामुळे अवघ्या १५ वर्षांचा हा पठ्ठ्या सुवर्णपदक विजेता ठरला.

१९९८ मध्ये अभिनव बिंद्रा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यावेळी अभिनवचं वय १५ इतकं होतं. भारताकडून सर्वात कमी वयात राष्ट्रकुलमध्ये सहभागी होण्याचा मान तेव्हापासून अभिनवच्या नावावर होता. तो यंदा अनिशनं मोडला. इतकंच नव्हे, तर सर्वात कमी वयात राष्ट्रकुलमध्ये भारताकडून सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचा विक्रमही अनिशनं त्याच्या नावावर केला. काही दिवसांपूर्वीच नेमबाज मनू भाकरनं १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. मनूचा हा विक्रमदेखील आता अनिशच्या नावावर जमा झाला आहे. भारतीय नेमबाजीचं भविष्य उज्ज्वल असल्याचं अनिशनं दाखवून दिलं आहे. याशिवाय त्याची ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.  
 

Web Title: inspiring journey of anish bhanwala indias youngest ever commonwealth gold medalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.