संकटांना पार करणारा तिचा प्रवास आणि जिद्दीपुढे झुकले आकाश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 06:54 PM2020-01-04T18:54:53+5:302020-01-04T19:19:23+5:30
आयुष्यात प्रत्येकाला एक धक्का बसतो असं म्हटलं जातं. अशावेळी वेळीच सावरणं झालं नाही तर गडगडत जाणारेही अनेकजण बघायला मिळतात मात्र त्या धक्क्यातून मार्ग काढला तर आयुष्य शिखरावर जातं . यातल्याच एक आहेत किरण डिम्बला
पुणे : आयुष्यात प्रत्येकाला एक धक्का बसतो असं म्हटलं जातं. अशावेळी वेळीच सावरणं झालं नाही तर गडगडत जाणारेही अनेकजण बघायला मिळतात मात्र त्या धक्क्यातून मार्ग काढला तर आयुष्य शिखरावर जातं . यातल्याच एक आहेत किरण डिम्बला. वयाच्या ३३व्या वर्षांपर्यंत एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या नवऱ्याची बायको, दोन मुलांची आई असं सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या किरण यांना नियतीने एक धक्का दिला आणि त्यातून जन्माला आली ती आज हजारोंसाठी आशेचा किरण बनलेली महिला बॉल्डीबिल्डर, सिक्स पॅक ऍब्स असणारी सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर , डी जे, गायिका आणि बरंच काही.
हैद्राबादमध्ये राहणाऱ्या किरण यांना वयाच्या ३३व्या वर्षी मेंदूत रक्ताची गाठ झाल्याचे निदान झाले आणि सुरुवातीला त्यांनाही धक्का बसला. त्यातून जरा सावरल्यावर त्यांनी स्वतःचेच निरीक्षण करण्यास सुरुवात केली. कॉलेजमध्ये सडपातळ आणि उत्साही असणाऱ्या किरण यांना स्वतःत झालेला बदल जाणवला आणि त्यांनी जिममध्ये धाव घेतली. आजारपणावरील उपचार संपल्यावर त्यांनी ७ महिन्यांच्या व्यायामात तब्बल २४ किलो वजन घटवलं. 'त्यावेळी मी पहिल्यांदा स्वतःतला बदल सुखावणारा अनुभवला'.किरण यांनी सांगितले. हळूहळू त्यांना व्यायामाची सवय लागली आणि शक्यतो भारतात न केल्या जाणाऱ्या महिलांच्या बॉडी चॅम्पियनशिपमध्ये रस निर्माण झाला. या क्रीडाप्रकारात त्यांनी इतके नैपुण्य मिळवले की त्यात भारताचे जागतिक स्तरावर प्रतिनीधित्वही केले. त्यांनी हंगेरी येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत भाग घेतला. आणि दुर्दैवाने त्याच दरम्यान त्यांच्या घरातील तीन सदस्यांचा अपघाती मृत्यू झाला. या स्पर्धेच्या आधी जवळपास १५ दिवस शरीरात कमीतकमी पाणी जायला हवे. घरात दुःखद वातावरण असतानाही त्यांनी पतीच्या पाठिंब्यावर आपले डाएटही पाळले आणि या स्पर्धेतल्या 'मोस्ट ब्युटीफुल बॉडी' किताबावर नाव कोरले. याच व्यायामाच्या आवडीपोटी त्यांनी स्वतःची जिम सुरु केली. आज त्या प्रकाश राज, अनुष्का शेट्टी यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या फिटनेस ट्रेनर आहेत. किरण आता हैद्राबादमध्ये डीजे म्ह्णूनही आपला छंद जोपासत आहेत. अजूनही त्यांना अनेक क्षेत्रं खुणावतात.
याबाबत प्रवासाबाबत किरण म्हणतात की, 'ध्येयाला वयाची बंधनं नसतात. फक्त पुरुष सिक्स पॅक ऍब्स बनवतात, असा गैरसमज आहे. बॉडी बिल्डिंगसारख्या क्षेत्रात मोठी संधी आहे, पण इच्छा असूनही अनेक तरुणी असे वेगळे मार्ग निवडत नाहीत. माझा त्यांना सल्ला आहे, लोकांकडे दुर्लक्ष करून त्यांनी या क्षेत्रात यावे. माझेही दंड (बायसेप्स) बघून मी पुरुषी दिसते अशी शेरेबाजी व्हायची, मात्र त्यांची तोंडं बंद झाली, जेव्हा २०१३साली जागतिक बॉल्डी बिल्डिंगस्पर्धेत थेट सहभागी होण्याची संधी मिळालेली मी एकमेव महिला ठरले. लोक बोलत राहतील पण आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली तर काहीही कठीण नाही,असं सांगताना किरण यांच्या डोळ्यात कर्तृत्वाचे तेज लखाखत असते....