आंतर क्लब पिकलबॉल स्पर्धा; यजमान पीटीकेएस संघाने राखले निर्विवाद वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 03:18 AM2021-01-19T03:18:05+5:302021-01-19T03:19:38+5:30
साखळी फेरीत जेएमडीवायसी संघाने तुफानी खेळ करताना आपले तिन्ही सामने जिंकत दिमाखात अंतिम फेरीत गाठली. यानंतर पीटीकेएस संघाने निर्णायक सामन्यात एमबीपीए संघाचा ११-४ असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ लढती जिंकताना सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचवली.
मुंबई : अत्यंत चुरशीच्या झालेल्या पिकलबॉल अंतिम सामन्यात मोक्याच्यावेळी खेळ उंचावलेल्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल (पीटीकेएस) संघाने जय मंगलदीप यूथ क्लब (जेएमडीवायसी) संघाचे कडवे आव्हान ८-७ असे परतावले. यासह पीटीकेएस संघाने यंदाच्या मोसमातील पहिल्या आंतर क्लब पिकलबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
कर्जत येथील पुष्पा स्पोर्ट्स अकॅडमी येथे पीटीकेएसच्या यजमानपदाखाली झालेल्या या स्पर्धेत चार संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मिरा भाईदर पिकलबॉल असोसिएशन (एमबीपीए) आणि पिकलबॉल कम्युनिटी क्लब (पीसीसी) या संघांचाही समावेश होता. प्रत्येक संघाला साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध १५ लढती खेळण्याची संधी मिळाली. पीटीकेएसचे चेअरमन आणि हौशी पिकलबॉल महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरविंद प्रभू यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
साखळी फेरीत जेएमडीवायसी संघाने तुफानी खेळ करताना आपले तिन्ही सामने जिंकत दिमाखात अंतिम फेरीत गाठली. यानंतर पीटीकेएस संघाने निर्णायक सामन्यात एमबीपीए संघाचा ११-४ असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ लढती जिंकताना सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचवली. मात्र येथून यजमान पीटीकेएस संघाने सामन्यावर पकड मिळवत सलग दोन लढती जिंकताना ७-५ अशी भक्कम आघाडी मिळवली.
जेएमडीवायसीनेही लढवय्या खेळ करताना ६-७ अशी पिछाडी भरुन काढली. यानंतर आणखी एक दुहेरीचा सामना जिंकत पीटीकेएस संघाने ८-६ अशी विजयी आघाडी घेत जेतेपद निश्चित केले. यानंतरचा अखेरचा औपचारिक सामना जेएमडीवायसीने जिंकला खरा, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पीटीकेएस संघाकडून अनिकेत दुर्गावळी, अभिषेक सप्रे, सुहास कोकाटे, समीर ओक, यश देशमुख आणि निखिल मथुरे यांनी, तर जेएमवायडीसी संघाकडून सचिन पाटील, प्रशांत राऊळ, कपिल रमुका, मनोज जाधव, अनुराग नायर यांनी चमकदार खेळ केला.