बलस्थानांचा लाभ घेण्यास डेअरडेव्हिल्स-आरसीबी इच्छुक
By admin | Published: April 8, 2017 12:44 AM2017-04-08T00:44:55+5:302017-04-08T00:44:55+5:30
आघाडीच्या खेळाडूंच्या जखमांमुळे त्रस्त असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू(आरसीबी) आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स आज, शनिवारी समोरासमोर येत आहेत
बंगलोर: आघाडीच्या खेळाडूंच्या जखमांमुळे त्रस्त असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू(आरसीबी) आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स आज, शनिवारी समोरासमोर येत आहेत. उभय संघ बलस्थानांच्या बळावर बाजी मारण्याच्या प्रयत्नात आहेत.
विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या अनुपस्थितीत आरसीबीला सलामी लढतीत हैदराबादकडून ३५ धावांनी पराभवाचे तोंड पाहावे लागले. हे दोघे आज, शनिवारच्या सामन्यातही दिसणार नाहीत. डेअर डेव्हिल्स स्पर्धा सुरू होण्याआधीच कमकुवत वाटत आहे. द. आफ्रिकेचे क्विंटन डिकॉक, डेपी ड्युमिनी, लंकेचा अँजेलो मॅथ्यूज आजारी श्रेयस अय्यर हे बाहेर आहेत. ऋषभ पंत वडिलांच्या निधनामुळे खेळणार नाही.
गोलंदाजीचा भार कर्णधार जहीर खान, कॅसिगो रबाडा, मोहम्मद शमी, अमित मिश्रा आणि कुशाल परेरा यांच्या खांद्यावर असून, अष्टपैलुत्व सिद्ध करण्याची जबाबदारी ख्रिस मॉरिस कोरी अॅण्डरसन व कार्लोस ब्रेथवेट यांना स्वीकारावी लागेल. फलंदाजीत मात्र डेअरडेव्हिल्सच्या उणिवा पुढे आल्या आहेत. स्टार खेळाडूंच्याअनुपस्थितीत सॅम बिलिंग्स, करुण नायर, संजू सॅमसन यांच्यावर धावा काढण्याची जबाबदारी असेल.
आरसीबीबाबत सांगायचे झाल्यास गोलंदाजीची भिस्त टायमल मिल्स, अनिकेत चौधरी, श्रीनाथ अरविंद आणि काळजीवाहू कर्णधार शेन वॉटसन यांच्यावर असणार आहे. लेग स्पिनर यजुवेंद्र चहलची चमक संघासाठी लाभदायी ठरू शकेल. ख्रिस गेल, मनदीपसिंग, ट्रेव्हिस हेड, केदार जाधव आणि वॉटसन यांच्यापुढे अनुकूल खेळपट्टीवर मोठी खेळी करण्याचे आव्हान असेल.(वृत्तसंस्था)