आंतरराष्ट्रीय कॅरम : भारताचा डबल धमाका! पुरुष, महिलांचे सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 12:21 AM2019-12-06T00:21:25+5:302019-12-06T00:21:53+5:30
पीवायसी हिंदू जिमखाना येथे विश्वविजेते प्रशांत मोरे व एस. अपूर्वा यांच्या जोरावर भारताने अनुक्रमे श्रीलंका व मालदीवचा ३-० असा पराभव केला.
पुणे : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन आॅफ पुणे यांच्या यजमानपदाखाली आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन (आयसीएफ) चषक स्पर्धेत भारतीय संघाने सांघिक गटात डबल धमाका केला. यजमान भारताच्या पुरुषांनी श्रीलंकेचा, तर महिलांनी मालदीवचा सहजपणे धुव्वा उडविला. पीवायसी हिंदू जिमखाना येथे विश्वविजेते प्रशांत मोरे व एस. अपूर्वा यांच्या जोरावर भारताने अनुक्रमे श्रीलंका व मालदीवचा ३-० असा पराभव केला.
पुरुष एकेरीत प्रशांत व श्रीलंकेचा २०१२ चा विश्वविजेता निशांत फर्नांडो यांच्यातली लढत चांगलीच रंगली. प्रशांतने ही लढत २५-२१, २५-७ अशी जिंकली असली तरी निशांतने त्याला झुंजवले. यानंतर झहीर पाशाने शाहीद ईल्मीला २५-१०, २५-१६ असे नमविले.
राजेश गोहिल व इर्शाद अहमद यांनी दुहेरीत दिनेथ दुलक्षणे-अनास अहमद यांना २५-१४, २५-४ ने नमवून बाजी मारली. भारतीयांनी पहिल्या सेटमध्ये ११ गुणांचे दोन बोर्ड मारले, तर दुसऱ्यामध्ये दहा व नऊ गुणांचे दोन बोर्ड मारत आपले वर्चस्व राखले. बांग्लादेशने मालदीवचा २-१ ने पराभव करून कांस्यपदक मिळविले. महिलांमध्ये माजी विश्वविजेती रश्मीकुमारीने मालदीवच्या अमिनाथ विधाधचा २५-१०, २५-० असा पराभव केला. विश्वविजेती अपूर्वाने अमिनाथ विषमाचा २५-५, २५-५ असा पराभव करत विजेतेपद भारताच्या अवाक्यात आणले.