मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 06:50 AM2022-02-20T06:50:16+5:302022-02-20T06:50:42+5:30
४० वर्षांनंतर भारताला मिळाले यजमानपद, मुख्यमंत्र्यांनी मानले नीता अंबानींचे आभार
मुंबई : भारत ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषविणार आहे. मुंबईत आयओसीची १४० वी बैठक पुढच्या वर्षी प्रथमच आयोजित केली जाईल. शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत भारताने पुढील बैठकीचे यजमानपद मिळविले.
यावेळी कोणत्याही देशाने भारताला विरोध केला नाही. बैठकीत सहभागी असलेल्या भारतीय प्रतिनिधी नीता अंबानी यांनी भारताच्या ऑलिम्पिक महत्त्वाकांक्षेसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. १९८३ नंतर भारतात होणार असलेल्या या बैठकीचे आयोजन अत्याधुनिक जिओ विश्व कन्व्हेंशन सेंटरमध्ये होणार आहे. या बैठकीला १०१ नियमित मतदार सदस्य आणि ४५ मानद सदस्य उपस्थित राहतील.
१३९ व्या बैठकीत भारताकडून क्रीडा आणि युवा मंत्री अनुराग ठाकूर, अभिनव बिंद्रा आणि नरिंदर बत्रा हेदेखील सहभागी झाले आहेत. सत्रात, आयओसी सदस्य ऑलिम्पिक चार्टर आणि ऑलिम्पिकच्या यजमान शहराची निवड यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात.
मुख्यमंत्र्यांनी मानले नीता अंबानींचे आभार
या बैठकीत महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीता अंबानी यांचे ट्विट करीत आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले की, ‘२०२३ च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सेशनचे आयोजन करणे ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही तर भारताला क्रीडा क्षितिजावर पुढे नेण्याची संधीदेखील आहे. २०२३ चे सेशन मुंबई, महाराष्ट्राकडे आणण्याकरिता नीता अंबानी यांचे आभार.’