International Tiger Day: ...म्हणून वाघाच्या बछड्याला दिलं हिमा दासचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 03:35 PM2019-07-29T15:35:17+5:302019-07-29T15:35:51+5:30
मागील महिन्याभरात विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पाच सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बंगळुरू : मागील महिन्याभरात विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पाच सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हिमानं 20 दिवसांत विविध स्पर्धांमध्ये 200 ( चार) आणि 400 ( एक) मीटर शर्यतीत पाच सुवर्णपदकं जिंकली. 2018मध्ये 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. त्यानंतर तिनं आशियाई स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली. तिच्या या कामगिरीला सलाम करण्यासाठी आजच्या जागतिक व्याघ्र दिवसाचं औचित्य साधून बंगळुरू येथील बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातील एका वाघाच्या बछड्याचं नाव 'हिमा' असं ठेवण्यात आले आहे.
'हारना नहीं है हिमा'... जग जिंकण्यासाठी 'सुवर्णकन्ये'ला वाढवावा लागेल वेग, गाठावी लागेल 'ती' वेळ!
हिमानं पोजनान अॅथलेटिक्स ग्रां. प्री. स्पर्धेत ( 2 जुलै ) 23.65 सेकंद, कुटनो अॅथलेटिक्स मीट स्पर्धेत ( 7 जुलै) 23.97 सेकंद, झेक प्रजासत्ताक येथे क्लांदो अॅथलेटिक्स ( 13 जुलै ) स्पर्धेत 23.43 सेकंद आणि झेक प्रजासत्ताक येथीलच टबोर अॅथलेटिक्स मीट ( 18 जुलै) मध्ये 23.25 सेकंदांसह 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. हिमाचे पुढील लक्ष्य हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे. ती म्हणाली,''या पाच सुवर्णपदकांनी ती हुरळून गेलेली नाही. कारण ही पाच सुवर्णपदके म्हणजे सराव होता, आता मला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकायची आहे.''
याआधीही बऩ्नेरघट्टा उद्यानात अस्वलांना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज यांचे नाव देण्यात आले आहे. जागतिक स्पर्धेची पात्रता निश्चित करण्यासाठी हिमाला 200 मीटर शर्यतीत 23.02 सेकंद आणि 400 मीटर शर्यतीत 51.80 सेकंदाची पात्रता वेळ नोंदवावी लागणार आहे. 7 सप्टेंबर 2018 ते 6 सप्टेंबर 2019 या कालावधीत होणाऱ्या स्पर्धांमध्ये ही वेळ नोंदवून जागतिक स्पर्धेच तिकीट निश्चित करता येणार आहे आणि हिमाकडे आता महिन्याभराचा कालावधी आहे.